खासदार नवनीत राणा 'फायर' नव्हे 'लायर' काँग्रेस प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर यांची टीका

 खासदार नवनीत राणा 'फायर' नव्हे 'लायर'

काँग्रेस प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर यांची टीका




अमरावती, - (युगनायक न्यूज नेटवर्क )
(ता. २१) :अमरावतीच्या भाजपप्रणीत खासदार नवनीत राणा यांनी फिल्मी स्टाईलमध्ये आपण 'फ्लॉवर' नाहीतर  'फायर' आहोत, असे म्हटले आहे. खरं बोलायचं झाल्यास त्या 'फायर' वगैरे काही नसून 'लायर' आहेत, अशी घणाघाती टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते एड. दिलीप एडतकर यांनी केली आहे.

अमरावती मतदारसंघातील  अल्पसंख्यांक,  विमुक्त भटके , आंबेडकरी व इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसींशी त्या प्रचंड खोट्या बोलल्या व वागल्या आहेत. त्यामुळे मेळघाटात जाऊन भोळ्याभाबड्या आदिवासींच्या समूहात स्वतःला 'फायर' म्हणवून घेण्याचा नवनीत राणा यांचा फुकटचा मोठेपणा हास्यास्पद असल्याचे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन निवडणूक जिंकणाऱ्या नवनीत राणा यांनी लोकसभेत आपण ज्यांच्यातर्फे निवडून आलो, त्यांच्या पाठीमागे उभे न राहता चक्क भाजपच्या तंबूत घुसखोरी करून पहिला खोटेपणा केला होता. अशी  व्यक्ती फायर नव्हे तर लायरच ठरते, असे सांगून नवनीत राणा यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतानाच निवडून आल्यास आपण काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत असू व तसे पाठिंब्याचे पत्र देऊ, अशी शपथ घेतली होती;  परंतु निवडून आल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेते पदासाठी पाठिंब्याचे पत्र काँग्रेसला दिले नाही. त्यामुळे मल्लिकार्जुन खरगे सारख्या आंबेडकरी नेत्याला विरोधी पक्षनेते पद मिळू शकले नाही. जर विरोधी पक्षाला  पाठिंब्याचे पत्र दिले असते तर आज काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांकडे विरोधी पक्ष नेतेपद आले असते. नवनीत राणा यांच्या  केवळ एका मताच्या गद्दारीमुळे विरोधीपक्ष, विरोधी पक्षनेतेपदास मुकला आहे. आंबेडकरी नेते मल्लिकार्जुन खरगे यांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये, म्हणून नवनीत राणा यांनी खोटेपणा केला. असा खोटेपणा करणाऱ्याला फायर नव्हे तर कायमच लायर् म्हटले पाहिजे, असे प्रदेश काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे.

निवडून आल्यानंतर ज्याप्रमाणे नवनीत राणा यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी  बेइमानी केली. त्याचप्रमाणे आपण कट्टर भाजप व मोदी विरोधी असल्याचे भासवून  ज्या मुस्लिम समाजाची त्यांनी भरभरून मतं घेतली त्यांच्याशीसुद्धा नवनीत राणा यांनी चक्क भाजपाशी हातमिळवणी करून बेइमानी केली. त्याचप्रमाणे नवनीत राणा यांनी धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन देऊन त्यांची मते घेतली; परंतु लोकसभेत धनगर आरक्षणासाठी तोंडातून 'ब्र' सुद्धा काढला नाही. ओबीसींची मते घेऊन ओबीसी अधिकाऱ्यांवरच काळी शाई फेकणा-या नवनीत राणा यांना 'लायर' म्हणणेच योग्य आहे. मेळघाटातील भोळ्या-भाबड्या आदिवासींसाठी आपल्या निधीतून एकही पैसा खर्च न करणाऱ्या 'लायर'  खासदारांनी आता स्वतःच्या तोंडून स्वतःला 'फायर' म्हणविण्याचा बालिशपणा करू नये, असे टिकास्त्र दिलीप एडतकर यांनी डागले आहे.  

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू