उद्या नाशिक येथे पंधरावे " विद्रोही मराठी साहित्य संमेलन" , ही बहुजन बांधवांसाठी एक आगळीवेगळी पर्वणी

 विद्रोही मराठी साहित्य संमेलन - एक समांतर चळवळ




नाशिक-युगनायक न्युज नेटवर्क

   नाशिकमध्ये ४ व ५ डिसेंबर रोजी   पंधरावे " विद्रोही मराठी साहित्य संमेलन" होत आहे, ही बहुजन बांधवांसाठी एक आगळीवेगळी पर्वणी आहे. 

      बहुजन हा शब्द यासाठी वापरला आहे की, बहुजनांमध्ये अठरापगड जाती अर्थात वंचित आणि दुर्लक्षित समुह येतात...या बहुजनांचा विद्रोह इथल्या अभिजनवादी साहित्य संस्कृतीविरुद्ध आहे. हा केवळ विरोधासाठी विरोध नसून इथल्या परंपरावादी साहित्य चळवळीचा इतिहासच काल्पनिक कथांच्या भोवती घिरट्या घालत होता, अशा प्रकारचे साहित्य लेखन करणारा वर्ग इथल्या समाज वास्तवाकडे आजही कानाडोळा करत आहे.. म्हणून या काल्पनिक, मनोरंजनवादी,विचार सरणीच्या, पोट भरलेल्या परंपरावादी संस्कृतीचा.. इथल्या कष्टकरी बहुजन जनतेने का स्वीकार करावा.? हा प्रश्न अनेक बहुजन साहित्यिकांना सतावत  होता आणि तो आजही सतावतो आहे. गरीब, दलित, पीड़ित, दुर्बल, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगार या 'नाही रे' वर्गाचे प्रश्न अखिल भारतीय साहित्य संमेलनात मांडले जात नव्हते, त्यात केवळ 'आहे रे' वर्गाच्या प्रश्नांभोवती अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा सोहळा फिरत होता. ही बाब वेगवेगळ्या जात समुहांतील विचारवंतांना, साहित्यिकांना बोचत होती.. यातूनच या अभिजनवादी साहित्य संमेलनाच्या विरोधात विविध जातसमुहाने आपापली साहित्य संमेलने भरवण्याची परंपरा सुरु केली आणि वेगवेगळे सवतेसुभे निर्माण झाले. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या विरोधात ही वेगवेगळी साहित्य संमेलने का उभी राहिली ? तर ज्या- ज्या समुहाचे प्रश्न अखिल भारतीय साहित्य संमेलनात मांडले जात नव्हते किंवा मांडले गेले नाहीत, ते प्रश्न या छोटया छोटया साहित्य संमेलनातून मांडले जाऊ लागले..यातूनच ही संमेलने फुले,आंबेडकरी विचारांचा वारसा घेत वेगवेगळ्या नावाने भरवली जाऊ लागली. अनेक दुर्लक्षित, वंचित समुहाने स्वातंत्र्याचे नवे रणशिंग फुंकले. स्वातंत्र्य, समता ,बंधुता, न्याय ह्या लोकशाही मूल्यांच्या आधाराने नव्या वास्तववादी विचारांची मांडणी करणारी विचारपीठे निर्माण होऊ लागली...वंचितांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा मांडला जाऊ लागला. 

        इथल्या विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात बहुजनांच्या महापुरुषांनी केलेला विद्रोह हा वंचित, पीडित, गोरगरीब, शोषित, गावकुसाबाहेरच्या लोकांच्या,महिलांच्या स्वातंत्र्यासाठीचा होता... तोच विद्रोह आजही करावा लागतो आहे, ही भारतीय जनतेसाठी मोठी शोकांतिका आहे. 

     लोकशाहीचा वर्ख लावून हुकुमशाही राज करते आहे, म्हणून भारतीय बहुजनांना आजही "यह आज़ादी झुठी"च वाटते ; नव्हे ती आहेच. वंचितांचे प्रश्न आजही सुटलेले नाहीत, ते आजच्या 'डिजिटल इंडिया'ने रुपांतरित केले आहेत.

      आज बहुजनांच्याच नव्हे; तर संपूर्ण भारतीय जनतेच्या स्वातंत्र्याचाच विचार मोडीत काढला जात आहे. वेगवेगळे मनसुबे रचून विचार स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे..  भारतीयांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे.

    अलिकडे शेतकरीविरोधी केलेले कायदे आणि या विरोधी आंदोलनात शेतकऱ्यांच्या झालेल्या हत्या ही अराजकतेच्या दिशेने होणारी वाटचाल म्हणावी लागेल.

       लोकशाहीच्या देशात हुकुमशाहीने हिरावलेल्या स्वातंत्र्याचा अधिकार मिळवण्यासाठीच्या लढाईला इथले सत्तापिपासू ’देशद्रोह' म्हणू लागले,.म्हणून आम्हांला यासाठी रस्त्यावर उतरून मोर्चे, आंदोलनाद्वारे असो की, साहित्याच्या संमेलनातून असो विद्रोहच करावा लागणार आहे, हा विद्रोह बहुजनांच्या स्वातंत्र्यासाठीचा आहे.

           पोट भरलेल्या समाजाचे प्रश्न मनोरंजनाचे असतात आणि उपाशीपोटी असणाऱ्या जनतेचे प्रश्न भाकरीचे असतात, भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी जिंदगी बरबाद करणाऱ्यांचे असतात.. ...पोट भरण्यासाठी गुन्हा करणाऱ्यांचे असतात. आई बहिणीवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रश्न असतात. गरीब, निर्दोष, गुन्हेगारी जगताचे असतात. दलित, पीडित, वंचितांचे वेगवेगळ्या पैलूंनी केलेल्या शोषणाचे असतात. हे प्रश्न अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून प्राधान्याने मांडले गेले नाहीत म्हणूनच वेगवेगळ्या नावाने साहित्य चळवळी निर्माण झालेल्या असाव्यात.

        दलित, ग्रामिण,आदिवासी, सत्यशोधकी, आंबेडकरवादी, बहुजनवादी, स्त्रीवादी, परिवर्तनवादी, अस्मितादर्श, अण्णाभाऊ साठे, संत रविदास, मुक्ता साळवे, गुणीजन, भूमीजन, विदर्भ, वऱ्हाडी, खानदेशी, कामगार, विद्रोही अशा विविध नावाने जातीची,समुहाची साहित्य संमेलने उभी राहिली. साहित्य चळवळी निर्माण झाल्या. याचे कारणही हेच असावे की,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात या समुहांना प्रतिनिधित्व मिळाले नसेल किंवा केवळ प्रतिनिधित्वच मिळाले असेल ; परंतु त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या तिथे मांडल्या गेल्या नसतील किंवा अभिजनवादी साहित्यिकांची विचारधारा बहुजनांचे प्रश्न मांडणारी नसेल किंवा भांडवलदारी, शोषणवादी, अंधश्रद्ध व्यवस्थेचे ती समर्थन करणारी असेल..! अशा अनेक कारणामुळे वेगवेगळ्या साहित्य चळवळीचा उदय झाला आहे.  

वेगवेगळे साहित्य आणि साहित्याचे प्रवाह निर्माण झाले आहेत आणि होत आहेत. 

       का होऊ नयेत ? झालेच पाहिजे..! पर्याय निर्माण झाल्याशिवाय दुर्बल, दुर्लक्षित समुहाचे प्रश्न समजणार नाहीत आणि ते समजलेच नाहीत.. तर ते सुटणारही नाहीत; म्हणून वैचारीक मंथनासाठी विविध साहित्य संमेलनांची आवश्यकताच आहे. 

      शोषण करणाऱ्यांचे समर्थन करणारे लोकच जर साहित्य संमेलनाचे सोहळे करत असतील तर या शोषणाच्या  विरोधात विद्रोह करण्यासाठी अशी साहित्य संमेलने होणे गरजेचे आहे. प्रा.प्रतिमा परदेशी आणि कॉम्रेड किशोर ढमाले या उभयतांचा शोषण व्यवस्थेच्या विरोधातील हा लढा आणि त्यांची ही चळवळ फुले, शाहू, बाबासाहेब, अण्णाभाऊ यांच्या स्वप्नांतील समताधिष्ठित समाज निर्माण होण्यासाठीची आहे. 

       बहुजनांचे साहित्य आणि अभिजनांचे साहित्य या दोन्ही साहित्य प्रवाहाची भूमिका अगदींच विरोधी आहे.

          अभिजनांचे साहित्य हे वास्तवाचे समर्थन करणारे नसून याउलट बहुजनांचे साहित्य हे वास्तवाचे समर्थन करणारे, वास्तवाचा शोध घेऊन त्याची चिकित्सा करणारे साहित्य हे बहुजनांचे साहित्य आहे. 

        अभिजनवाद्यांनी महात्मा फुले यांच्या  साहित्याला "सवंग व बाजारू" म्हटले होते आणि "अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे साहित्यच नाही"असे म्हटले होते. अशा टीकाकारांनी अण्णाभाऊंच्या साहित्यातच त्यांच्या टिकेचे उत्तर शोधावे. अण्णाभाऊ म्हणतात,आमची कला ही "बंदीस्त खोलीत मांडीवरच्या खुणा मोजणारी कला नाही" व "आमचे साहित्य हे कल्पनेच्या भराऱ्या मारणारं साहित्य नाही." बहुजनांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी शोषित पीडित, माणूस आहे.

     कल्पनावादी, मनोरंजनवादी,असत्याचा बोलबाला करणाऱ्या साहित्याचा इतिहासच जर बहुजनांच्या गळी उतरवण्यासाठी सोहळे होत असतील तर अशा साहित्य सोहळ्यांना विरोध करणे हे विद्रोही साहित्य संमेलनाचे कार्य आहे; नव्हे ती एक समांतर चळवळ आहे, असे म्हणावे लागेल. 

 अभिजनवादी साहित्यिकांचा एक कंपू आहे. ही कंपूशाही एका शतकापासून आहे ती कल्पनावादी, मनोरंजक आणि अवास्तववादाचे समर्थन करत आली आहे. हे समर्थन दलित, दुर्बल, दुर्लक्षित समुहाच्या हिताचे नाही. म्हणून अवास्तववादी साहित्याचे समर्थन करणाऱ्या अभिजनवाद्यापासून अनेक जातसमूह, भाषासमूह वेगवेगळे झाले आहेत... पुढे याचेच पुरोगामी आणि प्रतिगामी असेही वर्गीकरण झाले आणि पुरोगामी साहित्य व प्रतिगामी साहित्य म्हणून ओळखले जाऊ लागले.

       जातीयवाद, धर्मवाद, वर्चस्ववाद, प्रांतवाद असा माणसांमाणसात भेद निर्माण करून वर्गीकरण करणाऱ्या साहित्याचे प्रवाह निर्माण होण्याला कारणीभुत ठरणारे साहित्यिकांचे कंपू आणि त्यांच्या कंपूशाहीमुळे निर्माण होणारी छोटी छोटी  साहित्य संमेलने सामान्यांच्या प्रश्नाला साहित्यात चित्रित करू लागली..प्रस्थापित समुहाला याद्वारे एक जाणीव म्हणून विरोधीवर्ग निर्माण झाला ही प्रस्थापितांविरुद्ध सुरु झालेली एक समांतर चळवळ समजावी...अशा अनेक चळवळी निर्माण होऊ शकतात. त्या झाल्याही पाहिजेत..आणि त्या चळवळींनी वंचित, दुर्बल, दुर्लक्षित समुहाचे प्रश्न मांडले पाहिजेत, यासाठी अशा चळवळी नेटाने उभ्या राहात असतील, तर यात काही गैर आहे, असे वाटत नाही.


 डॉ.धोंडोपंत मानवतकर 

जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ,औरंगाबाद

Comments

Post a Comment

THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू