जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक पेड न्यूज संदर्भातील तक्रारींच्या चौकशीसाठी समिती गठीत
जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक
पेड न्यूज संदर्भातील तक्रारींच्या चौकशीसाठी समिती गठीत
वाशिम, दि. २० (युगनायक न्युज नेटवर्क) : वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या ६ पंचायत समित्यांचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या काळात मुद्रित प्रसारमाध्यमांमध्ये देण्यात येणाऱ्या पेड न्यूजच्या संदर्भातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी, निवासी उपजिल्हाधिकारी, सर्व मतदार विभाग तथा निर्वाचक गणाचे निवडणूक निर्णय अधिकारी, संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांचा समावेश असून जिल्हा माहिती अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरिता उमेदवारांनी करावयाच्या खर्चावर निवडणूक आयोगाने निर्बंध घातले आहेत. उमेदवाराने विहित मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यास अशा उमेदवारास अनर्ह ठरविण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहेत. तसेच पेड न्यूजवर होणारा खर्च कुठेही दर्शविला जात नाही. त्यामुळे हा खर्च निवडणूक खर्चात समाविष्ट होत नाही, ही बाब लक्षात घेवून पेड न्यूज संदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारींची चौकशी करून ही समिती आवश्यक कार्यवाही करणार असल्याचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME