विस्तीर्ण मराठवाड्यातील विकास कामांच्या गतीसाठी विविध प्रमुख कार्यालयांचा विस्तार आवश्यक – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
विस्तीर्ण मराठवाड्यातील विकास कामांच्या गतीसाठी विविध प्रमुख कार्यालयांचा विस्तार आवश्यक – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
नांदेड दि. 18 : मराठवाड्याचे विस्तीर्ण क्षेत्र, आठ जिल्ह्यातील विकास कामांचा असलेला अनुशेष आणि नागरिकांच्या गरजांचा प्राधान्यक्रम निश्चित करणे अत्यावश्यक आहे. हे लक्षात घेऊन शासनाने हाती घेतलेल्या विविध लोकाभिमुख योजनांच्या कामांना गती देण्यासाठी प्रमुख कार्यालयांचा विस्तार व अतिरिक्त सुविधा निर्माण करुन देणे अत्यावश्यक झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ते, पूल, इमारती यांचे संकल्पचित्र, गुणवत्ता नियंत्रण व दक्षता या संदर्भातील प्राथमिक कामे वेळीच पूर्ण होण्याच्या दृष्टीने नांदेड येथे ही दोन स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार आता ही दोन्ही कार्यालये नांदेड येथे सुरू झाल्याने 4 जिल्हे औरंगाबाद विभागात तर इतर 4 जिल्हे नांदेड विभागात सुरू झाल्याने संकल्पचित्र व गुणवत्ता नियंत्रण कामांना गती मिळेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
नांदेड येथे स्नेहनगर भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकुलात नव्याने सुरू करण्यात आलेल्या दक्षता व गुणनियंत्रण आणि संकल्पचित्र (पूल व इमारती) विभागाच्या कार्यालयाचे उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकीरडे, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, इतर वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यालयांच्या निर्मितीबरोबर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चांगल्या वातावरणात काम करता आले पाहिजे. जेवढे अधिक चांगले वातावरण अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळेल तेवढ्या चांगल्या प्रमाणात अधिकारी-कर्मचारी आपले काम गुणवत्तेने पूर्ण करतील यावर माझा विश्वास आहे. काम करतांना झालेल्या चुका एकवेळेस समजून घेता येईल. कामात जर कोणी टाळाटाळ करत असेल तर त्याबाबतही वेगळा विचार करावा लागेल, असे स्पष्ट करुन चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मागे मी खंबीरपणे उभा राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
रस्ते, पूल, इमारती सारख्या विकास कामांमध्ये आरेखनापासून त्याच्या नियोजनापर्यंत लागणारा कालावधी हा कमी करायचा जर असेल तर हे कार्यालय आणि कार्यालयातील मनुष्यबळ वाढविण्याशिवाय पर्याय नाही. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांपासून शासनाच्या विविध प्रकल्पातील योजनांच्या कामाचा व्याप केवळ औरंगाबाद येथे एकच कार्यालय असल्याने त्यावर पडत होता. आता हा व्याप विभागाला जाऊन विकास कामांच्या आरेखन, संकल्पचित्राचे काम नांदेड येथे सुरू झाल्यामुळे या होणारा विलंब टाळता येणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
विविध विकास कामांमधील गुणवत्ता हा अत्यंत महत्त्वाचा व जबाबदारीचा विषय असून त्यासाठी आवश्यक असणारा दक्षता व गुणनियंत्रण विभागही आता नांदेडमध्ये कार्यान्वित झाला आहे. विकास कामांसाठी उपलब्ध होणारा निधी किती आव्हानातून शासनाला पुरवावा लागतो याची जाणीव कंत्राटदारांनी ठेऊन कोणत्याही परिस्थितीत कामाच्या गुणवत्तेबाबत तडजोड करता कामा नये. मागील काळात मिळालेल्या कंत्राटाची इतर कंत्राटदारांना विक्री अशी फसवाफसवीची वृत्ती झाल्याने याचा कामाच्या गुणवत्तेवर मोठा दुष्परिणाम झाला. तसे कोणतेही प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे सांगून त्यांनी ज्या कंत्राटदारांनी गुणवत्तापूर्ण काम केलेले आहे त्यांचे पैसे अडकवू देणार नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. विकास कामांना लागणाऱ्या निधीची अडचण जरी असली तरी प्राधान्य क्रमाने जी कामे ठरविली आहेत, जी कामे अधिक लोकाभिमूख आहेत अशा कामांना निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहनही मिळाले पाहिजे. शासकीय पातळीवरुन अशा गुणवत्ताधारक अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याकरीता महसूल दिनाच्या धर्तीवर अभियंता दिनही पुढच्यावर्षीपासून आपण साजरा करु असे ते म्हणाले. यावेळी मुख्य अभियंता दिलीप उकिरडे व अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी आपल्या मनोगतात या नवीन कार्यालयाची रचना व महत्त्व विशद केले. कार्यक्रमास नवीन कार्यालयातील अभियंतासह इतर विभागातील अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.
00000
आरोग्याच्या खालोखाल यापुढे प्राथमिक शाळांच्या उभारणीवर अधिक भर - पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यातील ग्रामीण भागात जनतेला आरोग्याच्या सेवा-सुविधा चांगल्याप्रकारे उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने मागील 2 वर्षे महाविकास आघाडी शासनाने भर देऊन काम केले आहे. कोरोनाच्या लाटेतून सावरण्यासाठी नांदेड जिल्ह्यात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची उपलब्धताही पणास लागली. काही वर्षांपूर्वी आपण दूरदृष्टी ठेऊन ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणांना, सेवा-सुविधांना भक्कम करण्याचे काम केले. आता वाढत्या लोकसंख्येनुसार अनेक गावांच्या पंचक्रोषित नव्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज निर्माण झाली असून त्यावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
येळेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमीपूजन समारंभा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा परिषद आरोग्य सभापती पद्मा रेड्डी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
येळेगाव येथील व पंचक्रोषीतील जवळच्या गावांना या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने साध्या आजारांनाही लोकांना नांदेडला यावे लागत होते. लोकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी येळेगाव येथे आपण प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करीत असून याठिकाणी आरोग्य केंद्राला लागणारे चांगले आरोग्य वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करुन देऊ असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. कोविड-19 च्या आव्हानात्मक काळात आपण आरोग्यासाठी खूप व्यापक प्रमाणात काम केले आहे. जुन्या मोडकळीस आलेल्या व आयुष्यमान संपलेल्या रुग्णवाहिका बदलून आपण जिल्हाभरात 68 नवीन रुग्णवाहिका घेतल्या. नांदेड येथे 300 खाटांचे नवीन हॉस्पिटल आपण उभारत आहोत. ग्रामीण भागातील युवा-युवतींना वैद्यकीय क्षेत्रात सेवेची संधी मिळावी यादृष्टिने नर्सींग कॉलेजही आपण आकारास घातले आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील आरोग्य सेवा-सुविधा भक्कम करण्यासमवेत प्राथमिक शिक्षणाच्याही सेवा-सुविधा अधिक भक्कम करण्याकडे माझा आता कल असणार आहे. ग्रामीण भागातील असंख्य गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा अतिशय जीर्ण अवस्थेत आलेल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी वाढावी यादृष्टीने मोडकळीस आलेल्या शाळा नव्या स्वरूपात शिक्षणाशी जवळीकता साधणाऱ्या रचनेत यापुढे उभारण्यावर भर असेल, असेही सुतोवाच त्यांनी केले. प्रत्येक गावात आदर्श शाळा धोरण जिल्ह्याने स्वीकारुन शिक्षणाचे मार्ग अधिक प्रशस्त करण्याबाबत शिक्षकांनीही पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME