क्रीडापीठाच्या माध्यमातून खेळाडूंना घडवणार – क्रीडामंत्री सुनिल केदार
क्रीडापीठाच्या माध्यमातून खेळाडूंना घडवणार – क्रीडामंत्री सुनिल केदार
राष्ट्रीय क्रीडादिनी खेळाडूंचा गौरव
नागपूर दि. 30 : नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशातील क्रीडापटूंनी उत्तम कामगिरी केली. राज्यातील खेळाडू व मार्गदर्शक घडविण्यासाठी पुणे येथील क्रीडापीठ येत्या ऑक्टोबर महिन्यापासून कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.
राष्ट्रीय क्रीडादिनी विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विमला आर., शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त गणेश कोहळे, उपसंचालक क्रीडा व युवक कल्याण शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, तालुका क्रीडा अधिकारी पवन मेश्राम यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय खेळाडू गुरुदास राऊत, दिव्यांग खेळाडू क्रिकेट क्रीडा प्रकारातील मृणाली पांडे, दिव्यांग बुध्दिबळ खेळाडू मालविका बनसोड, बॅडमिंटन खेळाडू दिपिका ठक्कर, अल्फीया पठाण, रौनक साधवाणी, जलतरण पटू जयंत दुबळे, बुध्दिबळपटू संकल्प गुप्ता, जिम्नॅस्टिक मृणयी वालदे, आयुषी घोडेस्वार, योगपटू धनश्री लेकुरवाळे या खेळाडुंना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
खेळाडूंनी खेळामध्ये सातत्य ठेऊन देशाचे नाव उज्वल करावे, असे आवाहन श्री. केदार यांनी केले. 12 ते 19 जानेवारी 2022 या दरम्यान, जिल्ह्यात राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्रातून नामवंत खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक घडविण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी कुस्तीपटूंना सरावाकरीता कुस्तीमॅट तसेच बॉक्सिंगसाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू अल्फिया पठाणला प्रॅक्टीस मॅटचे वितरण श्री. केदार यांच्याहस्ते करण्यात आले.
जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत टोकियो ऑलिम्पिक नंतर झालेले मानसिक परिणाम याबाबत वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी तज्ज्ञ मार्गदर्शिका भारती नेरलवार यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, संचलन क्रीडा अधिकारी माया दुबळे यांनी केले. आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी अभय महल्ले यांनी केले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME