अल्पसंख्याक समुदायातील महिला बचतगटांना मिळणार २ लाख रुपयांचे कर्ज
अल्पसंख्याक समुदायातील महिला बचतगटांना मिळणार २ लाख रुपयांचे कर्ज
· मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची योजना
वाशिम, दि. ३० : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समुदायातील महिला बचतगटांना २ लाख रुपये कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेकरिता अर्ज व नाव नोंदणीसाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २० सप्टेंबर २०२१ पर्यंत आहे, असे मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
मुस्लीम, बौध्द, शीख, पारशी, ख्रिश्चन व जैन या अल्पसंख्याक समुदायातील महिलांच्या बचतगटांसाठी सूक्ष्म पतपुरवठा योजना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने राबविली जात आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ, राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या मदतीने ही योजना राबविण्यात येणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ किंवा इतर संस्थांनी बँकेशी जोडणी करून दिल्यानंतर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कर्जाची परतफेड केलेला महिला बचतगट मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत तिसऱ्या टप्प्यात २ लाख रुपये कर्ज घेण्यास पात्र राहील. यामध्ये महामंडळाचा हिस्सा १ लाख ९० हजार रुपये तर महिला बचतगटाचा हिस्सा १० हजार रुपये राहील.
अधिक माहितीसाठी महिला आर्थिक विकास महामंडळ, राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे कार्यालय किंवा मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय, आय.टी.आय. समोर, नवीन आययुडीपी कॉलनी, वाशिम येथे संपर्क साधावा, असे आवाहन मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME