सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप; ६ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप; ६ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
वाशिम, दि. ३० : राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या धोरणानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय काम वाटप समितीमार्फत जिल्ह्यातील सुशिक्षित बरोजगारांच्या सेवा सोसायटींना कंत्राटी तत्त्वावर काम वाटप करण्यात येते.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राकडे मालेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सफाई कामगाराचे १ पद, मानोरा येथील दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) न्याय दंडाधिकारी यांचे कार्यालयातील सफाई कामगारचे १ पद, मंगरूळपीर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सफाई कामगाराचे १ पद, वाशिम येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सफाई कामगाराचे १ पद, कारंजा येथील शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र येथील सफाई कामगाराचे १ पद अशा विविध कंत्राटी प्रकारची पदे भरण्यासाठी मागणी प्राप्त झाली आहे.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणीकृत जिल्ह्यातील इच्छुक व पात्र सुशिक्षित बेरोजगार सेवा सोसायटींनी ६ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपले प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय इमारत खोली क्र. ११, काटा रोड, वाशिम येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी केले आहे.
बरोजगारांची स्थापन केलेली सहकारी सेवा सोसायटी ही सहकार कायदा १९६० अन्वये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच ही संस्था कार्यरत असल्याबाबत जिल्हा उपनिबंधक, सहायक उपनिबंधक यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. संस्थेतील सदस्य क्रियाशील असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. प्रस्ताव सादर करणाऱ्या संस्थेचा आर्थिक वर्ष २०२०-२१ चा लेखा परिक्षण अहवाल सादर करावा. सुशिक्षित बेरोजगार संस्थेची नोंदणी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडे असणे आवश्यक आहे. बेरोजगार सेवा सोसायटी संबंधात वेळोवेळी निर्गमीत झालेले शासन निर्णय विचारात घेण्यात येतील.
सुशिक्षित बेरोजगार संस्थेला कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. संस्थेचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत किंवा अर्बन को-ऑप. बँकेत असणे आवश्यक आहे. संस्थेच्या सदस्यांचे सेवायोजना कार्ड चालू स्थितीत असणे आवश्यक आहे. याबाबत संस्थेला काही अडचणी असल्यास अथवा अधिक माहितीसाठी संबंधितांनी कार्यालयीन वेळेत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र येथे येवून मार्गदर्शन घ्यावे, असे श्रीमती बजाज यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME