कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी रोहयो व फलोत्पादनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात – रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे
कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी रोहयो व फलोत्पादनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात – रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे
नांदेड दि. 29 :- ग्रामीण भागात कृषी क्षेत्राच्या विकासासाठी पाणंद रस्त्याचा विकासही तेवढाच अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांना दळणवळणाच्या किमान सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने मातोश्री पाणंद रस्ते विकासावर शासनाने भर दिला असून रोहयो व फलोत्पादन विभागामार्फत शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक सुलभ निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन सभागृह येथे आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, रोहयो उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
शेततळयाच्या योजनेमध्ये पुर्वी असलेल्या त्रुटी आता दुर केल्या आहेत. शेततळ्याच्या अस्तरीकरणासह (पॉलिथीन) 5 लाख 34 हजार रुपयांचे भरीव तरतूद आपण केली आहे. सागवानच्या धर्तीवर ज्या शेतकऱ्यांना वृक्षलागवड करुन अधिकचे उत्पन्न मिळवायचे आहे, अशा शेतकऱ्यांसाठी आपण मोहगनी लागवडीवर भर दिला आहे. दहा वर्षात 30 ते 35 लाख रुपये उत्पन्न या वृक्षलागवडीतून शेतकऱ्यांना होत आहे. याचबरोबर रेशीम लागवडीतूनही शेतकरी आता अधिकचे उत्पन्न घेत आहेत. शरद पवार ग्रामसमृद्धी योजना आपण नव्याने सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना उत्कृष साधण्याचा नवा मार्ग मिळाला आहे. मोहगनी, रेशीम लागवड, शेततळे या योजना नांदेड जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहचाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे अशा सूचनाही रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिल्या.
प्रत्येक विभागांतर्गत लागणाऱ्या मनुष्यबळाचा आढावा घेऊन आवश्यक ते सर्व मनुष्यबळ व त्यासाठी लागणाऱ्या सोई-सुविधा आपण पोहचविल्या आहेत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी गटविकास अधिकारी यांनी मनात कोणतीही भीती न बाळगता प्रामाणिकपणे रोहयोच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. काम करीत असतांना काही चुका झाल्या तर शासन त्या समजून घेईल तथापि जाणिवपूर्वक जर कोणी चुका केल्या तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल, अशा इशाराही त्यांनी दिला.
विधान परिषदेचे सदस्य अमर राजूरकर यांनी पाणंद रस्त्यासाठी पूर्वी असलेला निधी अपुरा होता. यात वाढ केल्यामुळे पाणंद रस्त्याच्या गुणवत्तेसह अधिकाधिक व्यक्तींना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मदत झाल्याचे सांगून त्यांनी रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांचे अभिनंदन केले. आमदार बालाजी कल्याणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी नांदेड जिल्ह्यातील मगांराग्रारोहयो व फलोत्पादन विभागांतर्गत सुरु असलेल्या विविध विकास कामांचे सादरीकरण केले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांनी बैठकीत जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण कामांची माहिती दिली.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME