प्रत्येक गावात ‘मनरेगा’चे काम सुरु करावे - अपर मुख्य सचिव नंदकुमार
प्रत्येक गावात ‘मनरेगा’चे काम सुरु करावे
- अपर मुख्य सचिव नंदकुमार
· जिल्ह्यातील रोहयो कामांचा आढावा
वाशिम, दि. २२ (युगनायक न्युज नेटवर्क) : जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किमान एक लाख रुपये करण्याचे उद्दिष्ट ठेवून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करावी. प्रत्येक गावामध्ये ‘मनरेगा’चे काम सुरु करून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी दिले. जिल्ह्यातील रोहयो कामांचा आढावा घेण्यासाठी आज, २२ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे यांच्यासह सर्व गट विकास अधिकारी व रोहयोचे तालुकास्तरीय कर्मचारी उपस्थित होते.
श्री. नंदकुमार म्हणाले, ‘मनरेगा’च्या माध्यमातून जिल्ह्यातील लोकांना समृद्ध बनविण्यासाठी काम व्हावे. वाशिम जिल्ह्यात चांगला पाऊस पडतो, पण पाणी अडविण्याची किंवा साठवण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी वाहून जाते. ‘मनरेगा’मधून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी मदत होईल. तसेच पांदन रस्ते, विहीर, शेततळे, गोठा, गोडावून यासारखी कामे करून शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देता येणे शक्य आहे. यासाठी गट विकास अधिकारी व कृषि विभागाने संयुक्त प्रयत्न करावेत. आगामी दोन महिन्यात जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये किमान ५ नवीन कामे मंजूर करावीत. तसेच अपूर्ण कामे पूर्ण करण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी, असे त्यांनी सांगितले.
‘मनरेगा’मधून जास्तीत जास्त कामे पूर्ण करून जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावता येणे शक्य आहे. त्यामुळे गट विकास अधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करून अधिकाधिक कामे सुरु करण्याचा प्रयत्न करावा. तसेच कोणतेही काम अपूर्ण राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच मजुरांना वेळेत मजुरी उपलब्ध होईल, कोणत्याही त्रुटीमुळे त्यांची मजुरी अदा करण्यामध्ये अडथळे येणार नाहीत, याकडे विशेष लक्ष द्यावे. सात दिवसांत मजुरी अदा करण्यामध्ये वाशिम जिल्ह्याचे काम चांगले असल्याचे श्री. नंदकुमार यांनी यावेळी सांगितले. तसेच नवीन कामे सुरु करण्यामध्ये किंवा कामे पूर्ण करण्यामध्ये जाणीवपूर्वक कुचराई करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही. त्यामुळे रोहयोची कामे करणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. लोकांनी काम मागण्याची वाट न पाहता, लोकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कोणते काम करणे आवश्यक आहे, हे लक्षात घेवून कामे सुरु करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. अपूर्ण कामे, मजुरी अदा करण्याची कार्यवाही आदी बाबींचा यावेळी त्यांनी तालुकानिहाय आढावा घेतला.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME