पशुचिकीत्सा व्यवसायी संघटनेने पुकारलेले कामबंद आंदोलन मागे घ्यावे जिल्हा परिषद प्रशासनाचे आवाहन · अन्यथा प्रशासकीय कारवाई
पशुचिकीत्सा व्यवसायी संघटनेने पुकारलेले कामबंद आंदोलन मागे घ्यावे
· जिल्हा परिषद प्रशासनाचे आवाहन
· अन्यथा प्रशासकीय कारवाई
वाशिम, दि. २२ (युगनायक न्युज नेटवर्क) : जिल्ह्यात पशुचिकीत्सा व्यवसायी संघटनेने १६ जुलै २०२१ पासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. पशुधन पर्यवेक्षक व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांना पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषदेच्यावतीने हे कामबंद आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पशुचिकीत्सा व्यवसायी संघटना यांना १९ जुलै २०२१ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वसुमना पंत यांनी त्यांच्या दहा मागण्या शासनस्तरावरच्या असल्याचे कळविले आहे. जिल्हा परिषद स्तरावरची फक्त पदोन्नतीबाबतची एक मागणी असून ती पूर्ण करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या राजपत्रात पशुचिकीत्सा व्यवसायी संघटनेला बावीस सेवा देण्याबाबत आदेशित केले आहे. या सेवा देण्यासाठी त्यांना पगार देण्यात येतो. सध्या पावसाळ्याच्या दिवसात जनावरांना लसीकरण व इतर सेवा देणे आवश्यक असतांना हे कामबंद आंदोलन संयुक्तीक व नियमाला धरुन नाही. तरी तात्काळ कामबंद आंदोलन मागे घेवून गोपालकांच्या पशुधनास सेवा पुरविण्यात यावी. अन्यथा आपणावर शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांना कळविले आहे.
सध्या पशुचिकीत्सा व्यवसायी संघटनेने पुकारलेला संप शासकीय नियमांना बसणार नाही. ज्या सेवा देण्याकरीता त्यांची नेमणुक करण्यात आली आहे. ती त्यांनी शेतकऱ्यांच्या पशुधनास पुरवून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी व कामबंद आंदोलन मागे घ्यावे अन्यथा नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे यांनी म्हटले आहे.
संघटनेच्या मागण्या ह्या शासनस्तरावरील असल्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरु केलेले कामबंद आंदोलन मागे घेवून गोपालकांना आपल्या सेवा उपलब्ध करुन दयाव्यात. सध्या पावसाळयात जनावरांना तात्काळ लसीकरण व प्रथमोपचार पुरविणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेवून आपला संप मागे घ्यावा. अन्यथा प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्हि. एन. वानखडे यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME