गर्भपात औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी राज्यात १४ गुन्हे दाखल

 

गर्भपात औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी राज्यात १४ गुन्हे दाखल






मुंबई,  (युगनायक न्युज नेटवर्क)दि. 20 : गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा (Medical Termination of Pregnancy Kit) गैरवापर होत असल्याची शक्यता गृहीत धरून या औषधाची खरेदी विक्री करणारे ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते तसेच गर्भपात करणाऱ्या रुग्णालयावर अन्न व औषध प्रशासनाने संपूर्ण राज्यभर दि. 26 जून 2021 ते 9 जुलै 2021 या कालावधीत तपासणी व धाडीची धडक मोहीम राबवून एकूण 348 ठिकाणी तपासणी केली. यात 14 गुन्ह्यांची नोंद झाली असून 11 व्यक्तींना अटक केली असल्याची माहिती औषध नियंत्रक प्राधिकारी व सहआयुक्त  दा. रा. गहाणे यांनी दिली.

या तपासणीमध्ये काही किरकोळ विक्रेते गर्भपातासाठी लागणारी औषधे (MTP Kit) अवैधरित्या प्राप्त करुन घेत असल्याचे, तसेच काही विक्रेते चढ्या दराने विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून संबंधित किरकोळ विक्रेत्यांना अवैधरित्या प्राप्त केलेले व चढ्या दराने, विना प्रिस्क्रीप्शन, विना बिलाने गर्भपाताची औषधे विकताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून एकुण 47 हजार 378 किंमतीची औषधे जप्त करण्यात आली व त्यांच्या विरोधात पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली.

अशा प्रकारच्या एकूण 13 किरकोळ विक्रेत्यांविरुद्ध राज्यभरात  मुंबई, ठाणे,  पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद या विभागामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मुंबईमधील  पश्चिम उपनगरातील एका हॉस्पिटलच्या डॉक्टरविरुद्ध त्यानी गर्भपातासाठी वापरलेल्या औषधाची माहिती न दिल्याने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील नोदविण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत अकरा  व्यक्तींना  अटक केली असून पोलिसांच्या वतीने पुढील कारवाई होत आहे. ज्या किरकोळ व ठोक विक्रेत्यांच्या तपासण्यामध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत, अशा 42 विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस  बजाविण्यात येत असून प्रशासन पुढील कारवाई करीत  आहे.

या प्रकरणी प्रशासनाच्या वतीने सर्व औषध विक्रेत्यांनी गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांची (MTP Kit) परवानाधारक संस्थेकडूनच खरेदी करावी. तसेच डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच औषध विक्री करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच सर्व संबंधितांनी गर्भपातासाठी लागणारी औषधे अवैध मार्गाने न घेता, तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावेत, असे आवाहन औषध प्रशासन विभागाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू