समृद्ध गाव स्पर्धेतील गावांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
समृद्ध गाव स्पर्धेतील गावांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
· पर्जन्यमापक यंत्राचे वितरण
वाशिम, दि. १९ (युगनायक न्युज नेटवर्क) : जिल्ह्यातील कारंजा व मंगरूळपीर तालुक्यातील ४३ गावांचा पानी फाऊंडेशनमार्फत आयोजित ‘समृद्ध गाव स्पर्धा’मध्ये समावेश आहे. या अंतर्गत मिनी स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील २९ गावे पात्र ठरली आहेत. यापैकी दोन्ही तालुक्यातील प्रत्येकी एका गावाचे सरपंच, वॉटर हिरो यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते १९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहातील कार्यक्रमात सन्मानपत्र, मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. तसेच त्यांना पर्जन्यमापक यंत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार अॅड. किरणराव सरनाईक, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, पानी फौंडेशनचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समृद्ध गाव स्पर्धा अंतर्गत मिनी स्पर्धेत पात्र ठरलेल्या कारंजा तालुक्यातील दोनद बु. आणि मंगरूळपीर तालुक्यातील पिंपरी खुर्द या गावचे सरपंच व वॉटर हिरो यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते हस्ते सन्मानपत्र, मानचिन्ह देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच या गावांना पर्जन्यमापक यंत्राचे वितरण करण्यात आले.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी समृद्ध गाव स्पर्धेचा एक भाग म्हणून ‘सोयाबीन डिजिटल शेती शाळा’चे आयोजन करण्यात येत आहे. या शेतीशाळेवर आयोजित ‘सोया वीन’स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम विजेता ठरलेल्या कौतिक विजय ढवळे यांना पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते सायकल कोळपे देवून सन्मानित करण्यात आले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME