ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाच्या उत्पन्न वाढीसाठी ‘क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोजेक्ट’ अंतर्गत सूक्ष्म नियोजन करा - अपर मुख्य सचिव नंद
ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाच्या उत्पन्न वाढीसाठी
‘क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोजेक्ट’ अंतर्गत सूक्ष्म नियोजन करा
- अपर मुख्य सचिव नंद कुमार
वाशिम, दि. २१ (युगनायक न्युज नेटवर्क) : जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ‘क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोजेक्ट’ (सीएफपी) राबविला जात आहे. यामाध्यमातून प्रत्येक कुटुंबाच्या उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याकरिता ‘सीएफपी’च्या माध्यमातून प्रत्येक गावनिहाय सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना मृद व जलसंधारण, रोजगार हमी योजना विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, २१ जुलै रोजी आयोजित ‘क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोजेक्ट’विषयक बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयो उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, पानी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे यांच्यासह सीएफपी चमूचे सदस्य उपस्थितीत होते.
श्री. नंद कुमार म्हणाले, ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मागेल त्याला व पाहिजे ते काम उपलब्ध करून देण्याबाबत ‘क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोजेक्ट’च्या माध्यमातून प्रयत्न करावेत. याकरिता वैयक्तिक अथवा सामुहिक लाभाची कामे करून ग्रामस्थांचे उत्पन्न कसे वाढविता येईल, याविषयी गावकऱ्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. सोबतच शेतीमधून कमी खर्चात अधिक नफा कसा मिळविता येईल, याविषयी सुद्धा मार्गदर्शन करावे. याकरिता काही प्रगतशील शेतकऱ्यांची उदाहरणे त्यांच्या समोर मांडावीत, असे त्यांनी सांगितले.
रोहयो अंतर्गत नियोजन करताना ग्रामस्थांच्या विकासाचा विचार झाला पाहिजे. ‘क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोजेक्ट’मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि लोकसहभाग यांची सांगड घालून काम करावे लागेल. याची सुरुवात गावनिहाय आराखडा तयार करण्यापासून करावी. सुरुवातीला जिल्ह्यातील पिछाडीवर असलेल्या तालुक्यांवर लक्ष केंद्रित करावे. गावात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब अडविणे ते त्या पाण्याचा योग्य वापर करण्याच्या अनुषंगाने आवश्यक बाबींचा समावेश आराखड्यात असावा. रोहयो अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाचे योग्य नियोजन करून गावाचे समृद्धी बजेट तयार करावे. प्रत्येक गावासाठी सूक्ष्म नियोजन करून ‘क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोजेक्ट’ची अंमलबजावणी करावी. रोहयो अंतर्गत गावाचा विकास करताना ग्रामस्थांना सहभागी करणे आवश्यक आहे, अशा सूचना श्री. नंद कुमार यांनी यावेळी दिल्या.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME