वाशिम जिल्ह्यात ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत नवीन नियमावली लागू · सर्व दुकाने

 जिल्ह्यात ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत नवीन नियमावली लागू

·        सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहणार

·        अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने शनिवारी, रविवारी बंद

·        हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळीमध्ये केवळ घरपोच पार्सल सेवेस मुभा

वाशिम, दि. ३१ (युगनायक न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी १ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. सद्यस्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत असल्याने जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १ जून रोजीच्या सकाळी ७ वाजेपासून ते ७ जून रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. याबाबतचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, ३१ मे रोजी नवीन आदेश निर्गमित केले आहेत.

 या आदेशानुसार जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सर्व दुकाने सकाळी ७ ते  दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहणार आहे. मात्र, शनिवारी व रविवारी केवळ किराणा दुकान, फळे, भाजीपाला विक्रेते, दुध डेअरी, पिठाची गिरणी, मांस, अंडी, मासे विक्रीची दुकाने व रेशन दुकाने ही अत्यावश्यक सेवेतील दुकानेच सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील. दुध डेअरी सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहील. तसेच घरपोच दुध वितरणास सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा राहील. जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र, कृषि उत्पन्न बाजार समिती दैनंदिन सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. आपले सरकार सेवा केंद्र, आधार केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर, बँक व्यवसाय प्रतिनिधी, बँक ग्राहक सेवा केंद्र सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील.

भाजीपाला दुकाने व फळेविक्रेते यांच्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी विकेंद्रित स्वरुपात ठिकाणे निश्चित करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. परवानगी दिलेल्या सर्व दुकानांमध्ये एकाच वेळी ५ पेक्षा अधिक व्यक्तींना प्रवेश देवू नये. तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी यापूर्वी पारित केलेल्या सर्व अटी व शर्तींचे, कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणर आहे. दवाखाने, मेडिकल स्टोअर्स, गुरांचे दवाखाने, ऑनलाईन औषध सेवा २४ तास सुरु राहतील.

हॉटेल, रेस्टॉरंट, चॅट कॉर्नर, बारमधून पार्सल सुविधेला मुभा

हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहील. मात्र, कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ अथवा शिवभोजन थाळी केंद्रामध्ये थेट प्रवेश असणार नाही. चॅट कॉर्नरच्या दुकानातून सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत पार्सल सुविधा सुरु राहील. मात्र, सदर दुकानाच्या ठिकाणी थांबून ग्राहकांना पदार्थ खाण्याची मुभा राहणार नाही. सर्व बार, दारू दुकानातून सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत पार्सल सुविधा सुरु राहील.

या बाबी राहणार पूर्णतः बंद

सार्वजनिक व खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने व बगीचे पूर्णतः बंद राहतील. सर्व केशकर्तनालये, सलून, स्पा, ब्युटी पार्लर बंद राहतील. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग पूर्णतः बंद राहतील. सिनेमागृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाट्यगृह, कला केंद्र, प्रेक्षकगृहे, सभागृहे पूर्णतः बंद राहतील. जिल्ह्यातील सर्व भाजी मार्केट, आठाडी बाजार व गुरांचे बाजार बंद राहतील.

सर्व प्रकारचे स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल पूर्णतः बंद राहतील. लग्न समारंभ करावयाचा असल्यास तो साध्या पद्धतीने घरगुती स्वरुपात करण्यात यावा. लग्नामध्ये मिरवणूक, जेवणावळी, बँड पथक यांना परवानगी राहणार नाही. लग्न समारंभासाठी यापूर्वी निर्गमित केलेल्या अटी व शर्ती कायम राहतील.

शासकीय कार्यालये २५ टक्के क्षमतेने सुरु; अभ्यांगतांना प्रवेश बंद

महसूल विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, नगरपरिषद, महावितरण सेवा, कोषागार कार्यालये, पाणी पुरवठा विभाग इत्यादी अत्यावश्यक सेवेतील कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरु राहतील. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये त्याच्या कार्यालयीन वेळेत २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु राहतील. याबाबतचे नियोजन संबंधित कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या स्तरावर करावे. सर्व शासकीय कार्यालये अभ्यांगतांसाठी पूर्णतः बंद राहतील.

शेतकऱ्यांना खरीप हंगामाकरिता पीक कर्ज विहित वेळेत उपलब्ध होण्यासाठी सर्व बँक तसेच पतसंस्था, एलआयसी ऑफिस, पोस्ट ऑफिस यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार कार्यालयीन वेळेत कर्मचारी उपस्थित ठेवण्यास मुभा राहील. सनदी लेखापाल यांची कार्यालये कमीत कमी कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील. ग्राहकांना कार्यालयात जाता येणार नाही. न्यायालयीन कामकाजासाठी सर्व विधिज्ञ यांना न्यायालयात जाता येईल. परंतु त्यांनी ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे. वृत्तपत्र कार्यालये, पत्रकार यांचे कामकाज आणि वृत्तपत्र विक्री, वितरण नियमितपणे सुरु ठेवण्यास मुभा राहील.

केवळ अत्यावश्यक कामासाठीच प्रवासी वाहतूक अनुज्ञेय

सार्वजनिक तसेच खासगी बस वाहतूक, रिक्षा, चारचाकी व दुचाकी वाहने यांची वाहतूक नागरिकांना अत्यावश्यक कामाकरिता अनुज्ञेय राहील. परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर जाण्या-येण्यास व प्रवास करण्यास मुभा राहील. याकरिता परीक्षर्थिनी ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील. जिल्ह्यांतर्गत माल वाहतूक सुरु राहील. कोणत्याही व्यक्तीला परराज्यातून महाराष्ट्रात किंवा जिल्ह्यात कोणत्याही वाहनाने प्रवेश करण्यापूर्वी जिल्हा प्रवेश परवानगी तसेच त्यांच्याकडे ४८ तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक राहील.

कार्गो सेवेची वाहतूक करतांना दोन व्यक्तींना (ड्रायव्हर आणि क्लीनर किंवा हेल्पर) यांना जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्याकडे ४८ तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत असणे बंधनकारक राहील. या अहवालाची वैधता ७ दिवसांपर्यंत राहील.

जिल्ह्यातील पेट्रोलपंप सर्वसामान्यांसाठी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील. तसेच दुपारी २ नंतर पेट्रोल वितरण करता येणार नाही. परंतु अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांची वाहने, शासकीय वाहने, शेती उपयोगी वाहने, रस्ते महामार्गाच्या कामावरील वाहने, दुध वितरक, मेडिकल चालक, पत्रकार इत्यादींना आवश्यक सेवेकरिता पेट्रोल वितरण करता येईल. हायवे वरील पेट्रोलपंप नेहमीप्रमाणे सुरु राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्राकरिता संबंधित मुख्याधिकारी तसेच ग्रामीण भागाकरिता संबंधित तालुक्याच्या गट विकास अधिकारी यांची राहील. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित तालुक्याचे इन्सिडेंट कमांडर तथा तहसीलदार यांची व पोलीस विभागाची राहील. हे आदेश सर्व आस्थापनांना, कार्यालयांना काटेकोरपणे लागू होतील. तसेच कोणत्याही क्षेत्रास कामकाज सुरु ठेवण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागेल.

सदर आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे समजण्यात येईल व संबंधितांवर सदर कलमानुसार कार्यवाही करण्यात येईल. अशी व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.












Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू