कानडे इंटरनॅशनल स्कूल येथे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्यास मान्यता
कानडे इंटरनॅशनल स्कूल
येथे डेडीकेटेड कोविड
हॉस्पिटल सुरु करण्यास
मान्यता
वाशिम, दि. २४ (युगनायक न्युज नेटवर्क) : कोविड १९ च्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून डॉ. विजय कानडे यांना शेलूबाजार रोड येथील कानडे इंटरनॅशनल स्कूल येथे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. याठिकाणी २५ बेडची सशुल्क सुविधा उपलब्ध झाली आहे.
डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये कोविड बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र प्रवेशाची व्यवस्था करावी लागेल. तसेच ४ आयसीयु बेड्स व १० बेडचे आयसोलेशन युनिट उपलब्ध करावे लागेल. कोविड रुग्ण भरती करून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यासाठी भारत सरकारच्या पोर्टलवरील नोंदणीकृत शुल्क आरण्यासह ‘आयसीएमआर’ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे तसेच महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे व मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे, उपचारासाठी लागणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी, अधिकारी वर्ग चोवीस तास नियमितपणे उपस्थित ठेवणे, रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या व्यक्तींची माहिती गोपनीय ठेवणे, तसेच रुग्णालयामध्ये पुरेशा प्रमाणात प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्निशियन), रुग्णवाहिका असणे बंधनकारक राहणार आहे.
ज्या व्यक्ती निरीक्षणाखाली ठेवण्यात येतील त्या वैद्यकीय कक्षात यासंदर्भात काम करणारे हॉस्पिटलचे मनुष्यबळ व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याशिवाय इतर कोणालाही प्रवेश राहणार नाही. तसेच याठिकाणी आलेल्या व गेलेल्या प्रत्येक व्यक्तींच्या आवश्यक नोंदणी ठेवणे बंधनकारक राहील. रुग्णांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दराने शुल्क आकारावे. शासनाने ठरवून दिल्यापेक्षा अधिक शुल्क आकारल्यास सदरची परवानगी रद्द करून कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच सदर कोविड केअर सेंटरचे क्षेत्र हे फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे. तसेच या आदेशाचे किंवा निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड सहिता (१८६० चा ४५) कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME