संचारबंदी नियमांची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

 संचारबंदी नियमांची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक

- जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.





 कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार



·  शहरी व ग्रामीण भागात संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक



·  नियमांचे उल्लंघन करणारे दुकानदार, आस्थापनाधारकांवर कठोर कारवाई करा






वाशिम, दि. २९ (जिमाका) : संचारबंदी नियमावलीची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. शहरी व ग्रामीण भागामध्ये या अनुषंगाने कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधित शासकीय यंत्रणा प्रमुखांनी चोखपणे पार पाडावी. यामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई झाल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिला. दुरदृश्य प्रणालीद्वारे आज, २९ एप्रिल रोजी आयोजित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार आढावा बैठकीमध्ये सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवातील दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यात काही ठिकाणी या कालावधी नंतरही दुकाने सुरु राहत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार, आस्थापनाधारकांवर नियमानुसार कारवाई करावी. सातत्याने नियम मोडले जात असल्यास सदर दुकान सील करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. शहरी व ग्रामीण भागामध्ये भाजीपाला, फळे विक्रीसाठी विकेंद्रित ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करावी. कोणत्याही परिस्थितीत एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

जिल्ह्यात ४५ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी तालुकास्तरावर योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयामध्ये उपलब्ध होणाऱ्या लसीचे डोस लक्षात घेवून त्यानुसार हे नियोजन करावे. तसेच जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी होवू नये, याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सांगितले.

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत म्हणाल्या, लसीकरणासाठी योग्य नियोजन आवश्यक असून ज्या व्यक्तींनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा व्यक्तींना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी संपर्क साधून माहिती देणे आवश्यक आहे. याकरिता प्रत्येक तालुकास्तरावर गट शिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्वात विशेष पथक स्थापन करून नागरिकांपर्यंत माहिती पोहचवावी. तसेच लसीकरण केलेल्या व्यक्तींची माहिती वेळोवेळी पोर्टलवर अद्ययावत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हिंगे यांनी संचारबंदी नियमावलीच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही, कोरोना चाचण्यांची संख्या, पाणी टंचाई आदी विषयी माहिती दिली.


Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू