दुर्गम भागातील महिलांमधील रक्तक्षयाची समस्या कमी करण्याचा संगीता शिंदे यांचा निश्चय
दुर्गम भागातील महिलांमधील रक्तक्षयाची समस्या कमी करण्याचा संगीता शिंदे यांचा निश्चय
महिला दिन विशेष
पतीचे पाच वर्षापूर्वी निधन झाले. आई-वडिलांचे मायेचे छत्रही नाही...मोठ्या भावाचा मिळालेला आधार तिला लाखमोलाचा....आपल्या दोन मुलींकडे पाहून तिने स्वत:ला सावरले...दुर्गम भागातील रक्तक्षयाची समस्या दूर करण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ती प्रत्येक डोंगराळ भागातील पाड्यांवर जाते.....धडगाव तालुक्यातील निगदी उपकेंद्रातील आरोग्यसेविका संगीता शिंदे यांनी गेली आठ वर्षे आरोग्यसेवेचा हा प्रवास सुरू ठेवला आहे.
संगीता यांचे पती गिरीष हुरेज यांचे आजारामुळे दुर्दैवी निधन झाल्यावर त्यांच्यासमोर भविष्याबद्दल मोठे प्रश्नचिन्ह उभे होते. मात्र मुलींसाठी आणि आपल्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी जबाबदारीपासून दूर होणे त्यांना मान्य नव्हते. त्यांनी तशाही परिस्थितीत आपले काम पुढे नेले. रुग्णांच्या वेदना कमी केल्यावर मिळणाऱ्या समाधानात आपले दु:ख विसरण्याचा प्रयत्न केला.
निगदी उपकेंद्रांतर्गत वावी आणि बोदला गावेही येतात. तिन्ही गावे मिळून 17 पाडे आहेत. यातील काही पाड्यांवर जाण्यासाठी संगीता यांना 3 ते 4 किलोमीटर पायी चालावे लागते. तर काही पाडे एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावर आहेत. ऊन असो वा पाऊस, त्या आपली जबाबदारी नीट पार पाडतात. विशेषत: महिलांना पौष्टिक आहार आणि रक्तक्षय टाळण्यासाठी आवश्यक खबरदारीची माहिती देतात.
सकाळी 8.30 वाजता त्यांचा दिवस सुरू होतो. भाऊ धनेश शिंदे आपल्या दुचाकीवर त्यांना गावात सोडतो आणि त्यानंतर पायी किंवा मिळेल त्या वाहनाने त्यांचा प्रवास सुरू असतो. लसीकरण, रुग्णांना औषधे देणे, आरोग्य तपासणी अशी कामे करीत सायंकाळी 6 वाजतात. घरी मुली वाट पहात असतात. त्यांच्याकडे पाहून आपला थकवा विसरत त्या घरकामाला लागतात.
डोंगराळ भाग असल्याने समस्या सातत्याने येतात. मात्र त्यामुळे माघार न घेता नव्या निश्चयाने त्या आपली जबाबदार पार पाडतात. पावसाळ्यात पाड्यांवर भटकंती करणे कठीण असते. अशा वेळी नागरिकांना आरोग्य सुविधाही आवश्यक असते. त्यामुळे शक्य त्या पद्धतीने त्या रुग्णांपर्यंत पोहोचतात. नागरिकांना त्यामुळेच संगीताताई आल्यावर दिलासा मिळतो.
गावातील नागरिकांना औषधे देणे, त्यांना आहाराविषयी माहिती देणे, लसीकरण यात त्यांचा वेळ जातो. काही वेळा लसीकरणाला विरोधही होतो. अशावेळी गावातील मोठ्या व्यक्तीची मदत घेऊन बाळाच्या आईला समजावण्याचा प्रयत्न त्या करतात. हत्तीगव्हाण पाड्यावर गरोदर असलेल्या महिलेला झोळीत टाकून 3 किलोमीटर पायी आणत तिची सामान्य प्रसूती केल्याची आठवण कायमस्वरुमी त्यांच्या मनात कोरलेली आहे. समाधानाचे अनेक क्षण आरोग्यसेवा देताना येत असल्याचे त्या सांगतात.
या भागात असणारी रक्तक्षयाची समस्या दूर करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. मातांना प्रसूतीच्यावेळी त्यामुळे मोठ्या समस्येला सामारे जावे लागते आणि जीवालाही धोका असतो. त्यामुळे माता आणि बाळाच्या आरोग्यासाठी रक्तक्षयाची समस्या कायमची जावी अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी किशोरवयीन मुलींना माहिती देण्यात त्यांना आनंद वाटतो. मासिक पाळीसारख्या नाजूक विषयावरही मुलींना मोकळेपणाने माहिती देण्यासोबत आशा सेविकांच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकीन वाटपही करतात.
दुर्गम भाग असल्याने आरोग्य सुविधांची मर्यादा लक्षात घेता पुढच्या पिढीत तरी किमान आरोग्याच्या समस्या राहू नये असे त्यांना वाटते. लहान मुलांना आजारी पाहिल्यावर त्याच्यातील आईची ममता जागृत होते आणि आपल्या मुलाप्रमाणे त्याला बरे करण्यासाठी त्या प्रयत्न करतात. आरोग्यसेविका म्हणून घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी अर्थार्जन जरी करीत असल्या तरी त्याला संवेदनांची जोड दिल्याने संगीता यांचे काम वेगळे ठरते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME