कारंजा तालुक्यात कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाया

कारंजा तालुक्यात कोरोना सुरक्षा नियमांचे
उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाया
·       एका दिवसांत ५० हजार रुपये दंड वसूल
·       सुरक्षा नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानावरही कारवाई
वाशिम, दि. ०६ :  कारंजा तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी काल, ५ मार्च रोजी कारंजा उपविभागीय कार्यालयात सर्व शासकीय यंत्रणांकडून आढावा घेतला. तसेच कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर, दुकानांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार कारंजा शहर व तालुक्यात कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर पोलीस विभाग, नगरपरिषद व ग्रामपंचायातींकडून दंडात्मक कारवाया सुरु करण्यात आल्या आहेत. आज, ६ मार्च रोजी तालुक्यात दंडात्मक कारवायांमधून एकूण ५० हजार ७५० रुपये दंड वसूल करण्यात आला.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांमार्फत नियोजनबद्ध प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व दुकानांवर कारवाई करण्यासाठी नगरपरिषदेमार्फत २ पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच पोलीस विभाग, ग्रामस्तरीय समितीमार्फतही दंडात्मक कारवाया केल्या जात आहेत.
नगरपरिषदेच्या पथकांनी आज मास्कचा वापर न करणाऱ्या २४ व्यक्तींवर, तसेच  कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन प्रकरणी  एका दुकानावर दंडात्मक कारवाई केली. यामधून १७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या व्यक्तींवर देखरेख ठेवण्यासाठी नगरपरिषदेने ३३ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती कारंजा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादासाहेब डोल्हारकर यांनी दिली. गृह अलगीकरण (होम आयसोलेशन) मधील व्यक्तींनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात दाखल करण्यात येणार आहे.
पोलीस विभागाने मास्क न वापरणाऱ्या ४५ व्यक्तींवर शनिवारी दंडात्मक कारवाई केली. यामध्ये २२ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. नागरिकांनी कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करावे, यासाठी पोलीस विभागामार्फत दंडात्मक कारवाईसोबतच जनजागृतीवर सुद्धा भर देण्यात येत आहे. याकरिता पोलीस विभागाच्या दोन वाहनावरील ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना कोरोना विषयक सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात असल्याचे पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांनी सांगितले.
ग्रामीण भागात मास्क न वापणाऱ्या व्यक्तींकडून शनिवारी दिवसभरात ११ हजार २५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ग्रामीण भागात कोरोना सुरक्षा नियमांचे पालन व्हावे, यासाठी ग्रामस्तरीय समितीमार्फत कार्यवाही सुरु आहे. तसेच ग्रामीण भागातील होम आयसोलेशनमधील व्यक्तींवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सुद्धा या समितीवर आहे, असे गट विकास अधिकारी कालिदास तापी यांनी सांगितले.






Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू