मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचारासाठी वर्षाचे ३६५ दिवस कार्यरत असणे आवश्यक – उदय सामंत
मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचारासाठी वर्षाचे ३६५ दिवस कार्यरत असणे आवश्यक – उदय सामंत
मुंबई, दि. 26 : मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचाराचे कार्य केवळ मराठी भाषा गौरव दिनापुरते मर्यादित न ठेवता ते वर्षाचे 365 दिवस चालू ठेवणे आवश्यक आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
ग्रंथालय संचालनालय आयोजित प्रबोधन पाक्षिक शताब्दी वर्ष व मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले.
श्री. सामंत म्हणाले, मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ भाषा असून आपल्या मातृभाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. मराठी भाषा दिन देशभरासह जगभरात साजरा केला जातो. प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठी भाषेचा वापर होणे आवश्यक असून यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.
पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील अभियांत्रिकी व तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम इंग्रजी भाषेबरोबर मराठी भाषेतही उपलब्ध करून देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मातृभाषेत तंत्रशिक्षण घेण्यास तसेच त्या विषयाची समज अधिक स्पष्ट होण्यास, मदत होईल असेही श्री.सामंत यांनी सांगितले.
दिल्लीत मराठी विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या नूतन विद्यालयाच्या विकास आणि नूतनीकरणाच्या कामासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांसाठी दिल्लीत राहण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सीमा भागातील मराठी विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. प्रबोधन पाक्षिकाचे शताब्दी वर्ष आपण साजरे करतोय, ही निश्चितपणे आनंदाची बाब आहे. राज्यामध्ये सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरूवात प्रबोधनकार ठाकरे यांनी केली. राज्याच्या जडणघडणीत त्यांचे स्थान हे अनन्यसाधारण असून त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हेच खऱ्या अर्थाने त्यांचे स्मरण असेल, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.
प्रबोधन पाक्षिक निर्मितीमागील केशव सीताराम ठाकरे यांचा मूळ उद्देश व त्या काळात त्यांना आलेल्या अडचणी याबाबत अभ्यासपूर्ण माहिती श्री. गुरव यांनी विषद केली. मराठी भाषा विविध साहित्याच्या माध्यमातून साहित्यिकांनी कशाप्रकारे संपन्न केली हे श्री. म्हात्रे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
यावेळी, ज्येष्ठ साहित्यिक अरूण म्हात्रे, प्रबोधन पाक्षिक विषयावरील संशोधक डॉ.अनंत गुरव, ग्रंथालय संचालिका शालिनी इंगोले व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME