‘वाशिम जिल्हा स्टार्टअप : बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशन’चे आयोजन
‘वाशिम जिल्हा स्टार्टअप : बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशन’चे आयोजन
· स्टार्ट-अप संस्कृतीचा विकास करण्यासाठी उपक्रम
· १५ मार्चपर्यंत प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार
वाशिम, दि. ०५ : जिल्ह्यात स्टार्ट-अप संस्कृतीचा विकास करण्यासाठी व नाविन्यपूर्ण संकल्पनांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून ‘वाशिम जिल्हा स्टार्टअप : बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशन २०२१’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वाशिम जिल्हा नाविन्यता परिषदेच्यावतीने व संत गाडगे बाबा विद्यापीठ रिसर्च अँड इन्क्युबेशन फाउंडेशन सेंटरद्वारा वाशिम येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये १७ व १८ मार्च २०२१ रोजी ही स्पर्धा घेण्याचे नियोजित असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा नाविन्यता परिषदेचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी दिली.
जिल्ह्याच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, बेरोजगारीच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पांवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्याकरिता ‘व्यवसाय नियोजन स्पर्धा’ अर्थात ‘बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशन’चे आयोजन करण्यात येणार येत आहे. आरोग्य, शेती, पर्यावरण, पर्यटन, सायबर सेक्युरिटी, शिक्षण व कौशल्य, प्रशासन व इतर विषयावर आधारित नाविन्यपूर्ण संकल्पना या स्पर्धेत मांडता येणार आहेत. या संकल्पना १७ व १८ मार्च रोजीच्या प्रदर्शनीमध्ये ठेवल्या जातील. तरुण संशोधक, वरिष्ठ संशोधक व तज्ज्ञ संशोधक अशा तीन गटात ही स्पर्धा विभागली जाणार आहे. २१ वर्षापर्यांच्यात स्पर्धकांचा समावेश तरुण संशोधक, २५ वर्षांपर्यंतचे स्पर्धक वरिष्ठ संशोधक आणि २५ वर्षांपुढील वयोगटातील स्पर्धकांचा समावेश तज्ज्ञ संशोधक गटात केला जाईल.
तरुण संशोधक गटातील १० विजेत्यांना एकूण २ लक्ष ७५ हजार रुपयांची बक्षिसे, वरिष्ठ संशोधक गटातील ५ विजेत्यांना एकूण १ लक्ष ५ हजार रुपयांची बक्षिसे, तज्ज्ञ संशोधक गटातील ५ विजेत्यांना एकूण २ लक्ष ९५ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच प्रत्येकी ५ हजार रुपये रक्कमेची ६ प्रोत्साहनपर पारितोषिकही देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे बक्षीस वितरण १८ मार्च २०२१ रोजी होईल. तरी या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी, युवकांनी सहभागी होवून आपले नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करावेत. स्पर्धेसाठी १५ मार्च २०२१ पर्यंत प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार असून सदर अर्ज सादर करण्यासाठी गुगल फॉर्मची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा नाविन्यता परिषदेच्या सचिव तथा जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME