जिल्ह्यात ८ मार्चपर्यंत संचारबंदी कायम
जिल्ह्यात ८ मार्चपर्यंत संचारबंदी कायम
* दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार
* प्रत्येक रविवारी दिवसभर संचारबंदी
* उपहारगृह, हॉटेलमध्ये केवळ पार्सल सुविधेस परवानगी
* रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी
वाशिम (जिमाका), दि. २८ : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्राबाहेरील क्षेत्रात लागू करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशांना ८ मार्च २०२१ रोजीच्या सकाळी ८ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी जारी केले आहेत.
संचारबंदी काळात जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहतील. रोज रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी राहील. या काळात रुग्णालये, रुग्णवाहिका, औषधी दुकाने, ठोक भाजीपाला विक्री, रेल्वे स्थानक व बसस्थानक तसेच खाजगी बसने उतरणाऱ्या प्रवाशांकरिता ऑटोरिक्षा, हाय वेवरील पेट्रोल पंप, धाबे, एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग सुरू राहतील. या उद्योगाचे कर्मचारी, कामगार यांना त्यांच्या कार्यालयाच्या ओळखपत्राच्या आधारे जाण्या-येण्याकरिता परवानगी राहील.
घरपोच दूध वितरण, रेस्टॉरंटमधील खाद्य पदार्थांच्या घरपोच वितरणास सकाळी ६ ते सकाळी ९ वाजेपर्यंत तसेच सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा राहील. जिल्ह्यात नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण भागातील आठवडी बाजार व गुरांचे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
प्रत्येक आठवड्यात शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार असून या काळात सर्व, दुकाने आस्थापना बंद राहतील. मात्र, या काळात दूध विक्रेते, डेअरी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा राहील. ग्राहकांनी दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी जवळपास असलेल्या बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदार यांचा वापर करावा. शक्यतोवर दूरचा प्रवास करून खरेदी करणे टाळावे. ठोक भाजी मंडई सकाळी ३ ते ६ वाजेपर्यंत सुरू राहील. परंतु, सदर मंडईमध्ये किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहील.
जिल्ह्यातील सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल, रेस्टॉरंट प्रत्यक्ष सुरू न ठेवता केवळ पार्सल सुविधा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. सर्व धार्मिक स्थळे ही केवळ एका वेळी १० व्यक्तींपर्यंत मर्यादित स्वरूपात नागरिकांसाठी सुरू राहतील. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन बंद राहणार आहेत.
लग्न समारंभासाठी वधू-वरासह केवळ २५ व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल. त्याकरिता नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात संबंधित नगरपालिका, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांची, तसेच ग्रामीण भागाकरिता तहसीलदार यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील. लग्न समारंभ किंवा इतर छोट्या समारंभ, कार्यक्रमात २५ पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास संबंधित मंगल कार्यालय, सभागृह, लॉनचे चालक अथवा मालक, व्यवस्थापक यांना २० हजार किंवा प्रति व्यक्ती ५०० रुपये यापैकी जी जास्त असेल त्या रक्कमेचा दंड आकारला जाईल. दुसऱ्यांदा अशी बाब आढळून आल्यास मंगल कार्यालय, सभागृह, लॉन १५ दिवसांसाठी सील केले जाईल. लग्न समारंभ अथवा कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी गर्दी होणारी मिरवणूक काढता येणार नाही. आयोजकांनी लग्नस्थळी किती लोक उपस्थित राहणार आहेत, याची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला कळविणे बंधनकारक राहणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद राहतील. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये (विद्यापीठ, शाळा, महाविद्यालये) येथील अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई-माहिती, उत्तरपत्रिका तपासणी, निकाल घोषित करणे इत्यादी कामाकरिता परवानगी अनुज्ञेय राहील. शहरी व ग्रामीण भागातील सर्व प्रकारची सिनेमागृह, मल्टिफ्लेक्स, व्यायामशाळा (जिम), स्पोर्ट कॉम्प्लेक्समधील इनडोअर, आऊटडोअर गेम्स, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील.
संचारबंदी कालावधीत होणाऱ्या पूर्वनियोजित परीक्षा ह्या त्यांच्या वेळापत्रकानुसार घेण्यात येतील. परीक्षार्थींना सदर कालावधीत परीक्षेचे ओळखपत्र (हॉल तिकीट) व पालकांनी त्यांचे ओळखपत्र जवळ ठेवणे बंधनकारक आहे.
मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू राहील आणि वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाहीत. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक करताना चारचाकी वाहनांमध्ये चालका व्यतिरिक्त इतर तीन प्रवासी अनुज्ञेय राहतील. ऑटोरिक्षा वाहनात चालक व्यतिरिक्त दोन प्रवासी यांना परवानगी राहील. आंतर जिल्हा बस वाहतूक करतांना बस मधील असलेल्या एकूण प्रवाशी क्षमतेच्या ५० टक्के प्रवासीसह सामाजिक अंतर व निर्जंतुकीकरण करून वाहतुकीला परवानगी राहील. याकरिता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक याबाबत नियोजन करतील.
नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील जे उद्योग सुरू ठेवण्यास यापूर्वी परवानगी देण्यात आली आहे, ते सर्व उद्योग सुरू ठेवण्यासाठी परवानगी राहील. कर्मचारी, कामगारांना त्यांच्या कार्यालयाच्या ओळखपत्राच्या आधारे ये-जा करण्याची परवानगी राहील. सर्व प्रकारची शासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, आरोग्य व वैद्यकीय, कोषागार, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एन. आय. सी., अन्न व नागरी पुरवठा, आयएफसी, एनवायके, नगरपालिका, बँक सेवा वगळून) ही १५ टक्के किंवा १५ व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरू राहतील. सर्व प्रकारच्या खाजगी कार्यालयातील आस्थापना ह्या १५ टक्के किंवा कमीत कमी १५ कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. सदर आदेश ८ मार्च २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
या आदेशाचे भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व अशा व्यक्ती, संस्था, संघटना, यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME