१२ जानेवारीपासून जिल्ह्यात युवा सप्ताहाचे आयोजन
१२ जानेवारीपासून जिल्ह्यात युवा सप्ताहाचे आयोजन
वाशिम, दि. ०८ (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १९ जानेवारी २०२१ या कालावधीत जिल्ह्यात युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय स्तरावर विविध स्पर्धा, उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
१२ जानेवारी रोजी सप्ताहाचे उद्घाटन होणार असून स्वामी विवेकानंद यांचे कार्य, तत्वज्ञान व विचार याबाबत युवांचे प्रबोधन, युवाबाबत उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती, युवक, युवतींचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच १५ ते २० वर्षे मुले-मुली आणि २० वर्षांवरील ते २९ वर्षांखालील युवक व युवती अशा दोन गटात विज्ञान-तंत्रज्ञान, प्रगती, समाजसेवा उपाय, युवांपुढील आव्हाने, नैसर्गिक साधन संपत्ती जतन करण्याकरिता युवांची भूमिका, स्वच्छता अभियान आदी विषयांवर जिल्हास्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
१४ जानेवारी रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये लोकशाही बळकटीमध्ये माझी भूमिका, इतिहास माझा मार्गदर्शक, ई-गव्हर्नन्स उपयुक्तता, शेती देशाचा आर्थिक कणा, साहित्य समाजाचे दिशादर्शक, स्वच्छता हे मिशन नसून अंगीकारावयाची वृत्ती, स्त्रीशक्ती ही आदिशक्ती आदी विषयांचा समावेश असेल. १५ जानेवारी रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच १६ जानेवारी रोजी स्थानिक स्तरावर युवक पुरस्कार्थी युवांना मार्गदर्शन करतील. कोव्हीड-१९ नियमांचे पालन करून या उपक्रमाचे आयोजन केले जाईल.
१७ जानेवारी रोजी यशस्वी व्यक्तींचे अनुभव कथन या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांममध्ये प्रेरणा व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. १८ जानेवारी रोजी युवांसाठी नोकरी, व्यवसाय, रोजगार व स्वयंरोजगार इत्यादीबाबत मार्गदर्शन केले जाईल. यामध्ये केंद्र व राज्य प्रशासकीय सेवेतील संधीची ओळख होण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यवसाय, स्वयंरोजगार मार्गदर्शन, युवा व युवतींसाठी उपयुक्त कायद्यांचे मार्गदर्शन, रोजगार मेळावा तथा कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल. १९ जानेवारी रोजी सप्ताहाचा समारोप व बक्षीस वितरण होईल.
कोविड-१९ महामारीचा प्रादुर्भाव विचारात घेवून एकत्रित येण्यास मनाई आहे. त्यामुळे या नियमांचे पालन करून शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच युवा दिन व युवा सप्ताहाचे आयोजन शाळा व महाविद्यालयांनी करावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी कळविले आहे.
छान बातम्या
ReplyDelete