कवठा येथील महिलांच्या सोलर एनर्जी कंपनीचा शुभारंभ
महाराष्ट्राला भूषणावह ठरेल अशी यशोगाथा निर्माण केली – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
कवठा येथील महिलांच्या सोलर एनर्जी कंपनीचा शुभारंभ
मागासवर्गीय महिलांनी उभारलेला राज्यातील पहिलाच प्रकल्प
वर्धा, दि 26 (जिमाका):- सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी लढा दिला, त्यावेळी त्यांच्यावर चिखल आणि दगडांचा मारा झाला होता. त्यांनी झेललेल्या संकटापेक्षा तुम्ही केलेले कष्ट कमी असले तरी सावित्रीबाई फुले यांच्याकडून प्रेरणा घेऊन तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन त्यांचेच स्वप्न साकार करीत आहात. ग्रामीण भागातील महिलांनी निर्माण केलेली वेगळ्या प्रकारच्या उद्योगाची ही यशोगाथा संपूर्ण महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे ,असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी केले
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील कवठा झोपडी या गावात मागासवर्गीय महिलांनी तेजस्वी सोलर एनर्जी को-ऑपरेटिव्ह संस्था निर्माण करून या माध्यमातून सोलर पॅनल निर्मितीचा उद्योग उभारला आहे. आज याचा शुभारंभ पालकमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार रणजित कांबळे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उमेदच्या स्वाती वानखेडे, तेजस्वी सोलर एनर्जी कंपनीच्या संचालक संगीता वानखेडे, मनीष कावळे उपस्थित होते.
महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे, शिक्षण घेऊन मोठे होण्याचे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करीत असल्याबाबत त्यांनी तेजस्वी सोलर एनर्जी कंपनीच्या सर्व महिलांचे अभिनंदन केले. या प्रकल्पात तयार होणाऱ्या सोलर पॅनलच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. या फॅक्टरीमध्ये तयार होणारा माल हा गोडाउनमध्ये शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री सुनील केदार यांनी यावेळी महिलांना दिली.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर झपाट्याने विकासाच्या कामाला सुरुवात झाली. पण भूतो न भविष्यती असे जागतिक संकट कोरोनाच्या रूपाने मानवावर येऊन पडले. अख्ख्या जगाला थांबावे लागले. अशा या संकटात वर्धा जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक- राजकीय संघटना, पत्रकार यांनी एकोपा ठेवला. कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने आपले काम आणि कर्तव्य चोख बजावले. भर उन्हाळ्यात कापूस खरेदी,तूर खरेदी असो की मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचविण्याचा विषय असो शासनाने योग्यरित्या काम करून प्रश्न सोडवलेत. त्याचबरोबर मोठे आर्थिक संकट असूनही कोणत्याही कर्मचाऱ्याचा पगार थांबवला नाही की कपातही केला नाही. जिल्हा विकास निधी सुद्धा आता शंभर टक्के जिल्ह्याला मिळाला आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून महिला बचत गट महिला व बाल विकास खाते यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही सुनील केदार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना खासदार यांनी नोकरी मागणारे बनण्यापेक्षा महिलांनी दुसऱ्यांना नोकरी देण्याचा पर्याय स्वीकारून उद्योग उभारला आहे. हा उद्योग स्पर्धेत टिकण्यासाठी त्याचे योग्य मार्केटिंग करण्याचा सल्ला यावेळी दिला.
मागासवर्गीय महिलांना या उद्योगामुळे गावातच रोजगार मिळाला ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे असे मनोगत जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांनी यावेळी व्यक्त केले.
महिलांनी सुरू केलेला हा राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच आणि देशातील दुसरा प्रकल्प आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे. मात्र या उद्योगात मोठ्या आणि परदेशी कंपन्या असल्यामुळे आपल्यासमोर गुणवत्ता आणि किंमत या दोन बाबींवर स्पर्धेत टिकणे महत्वाचे आहे. त्यामुळे उद्योगातील उत्पादन गुणवत्तापूर्ण राहील याची काळजी घ्यावी. यासाठी आपल्याला सहकार्य करण्यास मी या क्षेत्राचा आमदार म्हणून सदैव तयार असेल अशी ग्वाही आमदार रणजित कांबळे यांनी याप्रसंगी बोलताना दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ओंबासे यांनी प्रास्ताविकात महिलांच्या उद्योगाची माहिती दिली. तर कंपनीच्या संचालिका संगीता वानखेडे यांनी मनोगत व्यक्त करताना 3 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा खडतर प्रवास आज आनंद आणि समाधान देणारा ठरत आहे. आमच्यासारख्या 10 वी 12 वी शिकलेल्या महिलांनी घेतलेली ही गरुड झेप प्रशासनाच्या सहकार्यामुळे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी पालकमंत्री केदार व उपस्थित मान्यवरांनी कंपनीची पाहणी करून महिलांच्या प्राविण्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आभार सत्यजित बडे यांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME