शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करून घेण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

 शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करून घेण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश



पुणे, दि. २८ : शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करून घ्याव्यात.  पालक व शिक्षण संस्थांनी शाळा सुरू करण्यासाठी सकारात्मक रहावे व ऑनलाईन शिक्षणाचा फायदा घ्यावा. ज्यांना पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांनी फॉर्म नंबर १७ भरून परीक्षा द्यावी, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.

राज्याच्या बोर्ड परीक्षेला जसे फॉर्म नंबर १७ चालतो तसा तो सीबीएसई, आईसीएससी शाळांबाबत चालेल का याबाबत शिक्षण विभागाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी सूचना देखील डॉ.गोऱ्हे यांनी शिक्षण विभागास केली. ग्रामीण व शहरी भागातील शाळा सुरू करण्यासंदर्भात डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पालक आणि संस्थाचालक यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती.

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक सोडियम हायपो क्लोराईड खरेदी करावे व त्याचे मिश्रण फवारावे. मान्यता नसलेल्या शाळा सुरू असल्याबाबत पिंपरी चिंचवड येथील पालकांनी मुद्दा उपस्थित केला. त्यावर डॉ गोऱ्हे यांनी मान्यता नसलेल्या शाळा सुरू करणे हा गंभीर गुन्हा असून याबाबत तात्काळ फौजदारी गुन्हा नोंद करावा व शिक्षण विभागाला कळवावे. शिक्षण विभागाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश दिले. मुले, शिक्षक व पालक यांचे मानसिक आरोग्य सर्वानी जपावे. शाळांनी तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर, ऑक्सिजन लेवल तपासण्यासाठी ऑक्सिमिटर घ्यावे, असे निर्देश दिले. ज्या शाळांनी शासनाच्या सूचना डावलून फी वाढ केली आहे तेथील पालकांनी शिक्षण विभागास कळवावे. शाळांनी कोरोना काळात फी वाढ करु नये याबाबत उच्च न्यायालयातील चाललेल्या दाव्यात राज्य सरकारने या महागड्या इंग्रजी शाळांची उदाहरणे वापरता येतील का, हे तपासून घ्यावे, असेही उपसभापतींनी शिक्षणविषयक सचिवांना सुचविले.

शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती वंदना कृष्णा यांनी १० नोव्हेंबर २०२० चे शिक्षण विभागाचे परिपत्रक स्पष्ट असल्याने आवश्यक काळजी घेऊन शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे सांगितले. ज्या मुलांना ऑनलाईन शिक्षण मिळाले नाही तरीही त्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी फॉर्म नंबर १७ भरून द्यावा व परीक्षा द्यावी असे सांगितले. सर्व मुलांना वापरता येईल अशी ऑनलाईन लिंक व परीपत्रकेही त्यांनी दिली.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व शाळा सुरु करण्यासंदर्भात कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले. सक्रिय रुग्ण राज्यात फक्त ६ जिल्ह्यात आहेत व त्यांची संख्याही खूपच कमी आहे. तसेच पालक,शिक्षक यांनी काही नियमावली पाळणे गरजेचे आहे असे सांगितले. शिक्षक अथवा विद्यार्थी जर आजारी असल्यास कोणीही शाळेत येऊ नये, शाळेत पुरेशी हवा खेळती राहील हे पाहावे व शाळा सॅनिटाइज करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईडचे मिश्रण करून गावात व शाळेत फवारावे, असे सांगितले.

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक श्री.यावलकर यांनी शिक्षकांनी शिकविताना मास्क वापरावा, वेळोवेळी मुलांची तापमान व ऑक्सिजन तपासणी करावी, पालक व शिक्षकांचे व्हाट्सॲप ग्रुप तयार करून समन्वय साधावा, असे सुचविले.

संस्था संचालक संघटना तसेच पुणे शहरातील पालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपल्या अडचणी तसेच सूचना मांडल्या.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू