कारंजा तालुक्यातील १८९५ जणांची नावे मतदार यादीतून वगळणार ३१ डिसेंबर पर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन
कारंजा तालुक्यातील १८९५ जणांची नावे मतदार यादीतून वगळणार ३१ डिसेंबर पर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन
वाशिम, दि. २६ (युगनायक न्युज नेटवर्क) : मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) स्थळ पंचनामा करून १८९५ जणांची नावे मतदार यादीमधून वगळण्यासाठी नमुना ७ चे अर्ज कारंजा तहसीलदार कार्यालयास सादर केले आहेत. या १८९५ मतदारांची यादी कारंजा तहसीलदार कार्यालय, कारंजा नगरपरिषद, पंचायत समिती तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर आणि www.washim.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत कोणाला आक्षेप असल्यास त्यांनी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत उपविभागीय अधिकारी, कारंजा किंवा तहसीलदार, कारंजा यांच्या कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मतदार यादीमध्ये फोटो नसणाऱ्या मतदारांचे फोटो संकलित करण्यासाठी बीएलओ यांनी त्यांच्या मतदार यादीतील मतदारांच्या पत्त्यावर भेटी दिल्या, मात्र सदर मतदार त्या पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून आले. तसेच त्यांचा संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे त्यांचे फोटो संकलित करणे शक्य झाले नाही. परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षरीने बीएलओ यांनी याबाबतचा स्थळ पंचनामा केला आहे. अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी नमुना ७ अर्ज कारंजा तहसीलदार कार्यालयात सादर केले आहेत.
मतदार यादीतून वगळण्यात येणाऱ्या १८९५ व्यक्तींच्या नावाची यादी उपरोक्त ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत कोणालाही आक्षेप असल्यास त्यांनी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत आपले आक्षेप अर्ज मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, कारंजा किंवा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, कारंजा यांच्या कार्यालयात सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, असे उपविभागीय अधिकारी, कारंजा यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME