ग्रामपंचायत निवडणुकीत आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा - जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस.

 ग्रामपंचायत निवडणुकीत आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा - जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस.





* ग्रामपंचायत निवडणूक आढावा बैठक
* तालुकास्तरावर मदत कक्ष स्थापण्याच्या सूचना

वाशिम,(जिमाका) दि.२२ : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार २३ डिसेंबर पासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यास सुरुवात होत असून १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या संपूर्ण निवडणूक कालावधी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिल्या. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आज, २२ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, उपजिल्हाधिकारी (महसूल) सुनील विंचनकर, उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार, वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, कारंजा व मंगरुळपीरचे उपविभागीय अधिकारी राहूल जाधव यांच्यासह  सर्व तहसीलदार व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत गाव पातळीवर आचार संहितेचे पालन होण्यासाठी, तसेच निवडणूक शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. उमेदवार तसेच मतदारांच्या मदतीसाठी प्रत्येक तालुकास्तरावर मदत कक्ष स्थापन करावेत. राज्य निवडणूक आयोगाच्या दिशा निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना परिपूर्ण प्रशिक्षण द्यावे. नामनिर्देशनपत्रांची छाननी करताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी तालुकानिहाय आढावा घेतला. तसेच जिल्ह्यातील संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू