प्रोजेक्ट मुंबई आणि पर्यावरण व हवामानातील बदल मंत्रालयाचा ‘पर्यावरण २.०’ उपक्रम जाहीर

 प्रोजेक्ट मुंबई आणि पर्यावरण व हवामानातील बदल मंत्रालयाचा ‘पर्यावरण २.०’ उपक्रम जाहीर


राज्यातील विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे उपाय सुचविण्याची संधी


विजेत्यांनी सुचविलेले उपाय महाराष्ट्र सरकार अंमलात आणणार

मुंबई, दि. २५ : पर्यावरण संवर्धनासाठी विना-नफा तत्त्वावर कार्यरत असणाऱ्या प्रोजेक्ट मुंबई आणि महाराष्ट्र सरकारच्या  पर्यावरण व हवामानातील बदल मंत्रालयाचा ‘एन्व्हॉयर्नमेंट(पर्यावरण) २.०-जेन नेक्स्ट: लँड, वॉटर, एअर’ हा उपक्रम जाहीर झाला असून या उपक्रमात ‘आयडियाज फॉर अॅक्शन’ या निबंध स्पर्धेद्वारे शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे उपाय सुचवण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमातसहभागी होण्याचे आवाहन पर्यावरण व हवामानातील बदल मंत्रालयाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी केले आहे.

प्रधान सचिव मनीषा म्हैसकर म्हणाल्या, महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण व हवामानातील बदल खात्याने नागरिकांना हवामानातील बदल व पर्यावरणीय समस्या याविषयी जागरुक करण्यासाठी, तसेच पर्यावरणामध्ये सुधारणा करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान’ हा सर्वांगीण उपक्रम हाती घेतला आहे. या खात्याने राज्याच्या शाश्वत विकासाच्या उद्देशाने हाती घेतलेला हा भूमी (पृथ्वी), जल (पाणी), वायू (हवा), अग्नी (ऊर्जा) व आकाश (सुधारणा) या पंचमहाभूतांवर आधारित असणारा भारतातील पहिलावहिला विशेष उपक्रम आहे. पर्यावरणविषयक प्रश्नांच्याबाबतीत तरुण पिढी उत्साहाने, बांधिलकीने व पुढाकाराने उपाय सुचवते आणि हे आमच्या दृष्टिकोनाशी मिळतेजुळते आहे. आमच्या खात्यामध्ये आयोजित केले जाणारे सर्व उपक्रम व योजना सर्व वयोगटांना सहभागी करून घेत आहेत. या पहिल्यावहिल्या उपक्रमात मुलांना सामावून घेण्यासाठी अतिशय उत्सुक आहोत.

प्रोजेक्ट मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी म्हणाले, “सार्वजनिक व खासगी सहभागाचे मॉडेल म्हणून प्रोजेक्ट मुंबईने नेहमीच समाजातील प्रत्येक श्रेणीसाठी व विशेषतः महत्त्वाच्या श्रेणींसाठी काम केले आहे. या उपक्रमाच्या बाबतीत, बालके व युवक यांच्याबरोबर काम केले जाणार आहे. त्यांचीही काही मते आहेत आणि ती ऐकली पाहिजेत. एन्व्हॉयर्नमेंट २.० जेन नेक्स्टकडे जाणारा आयडियाज फॉर अॅक्शन हा उपक्रम म्हणजे स्वच्छ हवा, जमीन व पाणी असलेले उत्तम पर्यावरण साध्य करण्यासाठी या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. या स्पर्धेसाठी भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

‘आयडियाज फॉर अॅक्शन’ यानिबंध स्पर्धेद्वारे युवकांना मुंबईतील व महाराष्ट्रातील भूमी, पाणी व हवा यासाठी उपाय सुचवण्याची संधी जबाबदार अशी युवा पिढी घडवण्यासाठी तरुणांमध्ये #मी for Maharashtra ही भावना रुजवणार आहे. या सर्जनशील उपक्रमामध्ये नीरी व पीडब्लूसी हे नॉलेज पार्टनर आहेत. राज्यातील प्रमुख नागरिकांचा सहभाग असलेले नामवंत परीक्षक मंडळ स्पर्धेतील विजेत्यांची निवड करणार आहे. त्यांना त्यांच्या कल्पना एका परिसंवादाद्वारे महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व अन्य पर्यावरण तज्ज्ञ यांच्यासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. विजेत्यांना ‘एन्व्हॉयर्नमेंट २.०-जेन नेक्स्ट: लँड, वॉटर, एअर’ या फेब्रुवारी २०२१ मध्ये होणाऱ्या परिषदेत सहभागी होण्याचीही संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी यापैकी स्वच्छ वायू, स्वच्छजल किंवा स्वच्छ भूमी कोणत्याही एका पर्यावरणीय आव्हानावर मात करण्यासाठी अंमलात आणता येईल असा उपाय सुचवणे अपेक्षित आहे.

ही निबंध स्पर्धा उच्च माध्यमिक शाळांसाठी (वय 14 ते 17) आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी (वय 17 ते 21) खुलीआहे. शाळा/महाविद्यालय/शैक्षणिक संस्था यांच्याद्वारे सादर करण्यात आलेल्या व प्रमाणित असलेल्या प्रवेशिका environment@projectmumbai.org  या ईमेलवर स्वीकारल्या जातील. प्रवेशिका ह्या मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषांमध्ये पाठवाव्यात. त्या टेक्स्ट/निबंध किंवा ऑडिओ/व्हीडिओ फाइल्स या स्वरूपात असाव्यात. प्रवेशिकांसाठी अंतिम तारीख 20 डिसेंबर  2020 आहे.या उपक्रमाविषयी अधिक माहितीसाठी श्रीमती सारिका चव्हाण 9821906665, श्रीमती दिप्ती जैन 9987812223 आणि श्रीमती रुपाली गोहील 9869354342 यांच्याशी संपर्क साधावा.


Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू