३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन रोजगार मेळावा; इच्छुक उमेदवारांनी सहभागी होण्याचे आवाहन
३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन रोजगार मेळावा;
इच्छुक उमेदवारांनी सहभागी होण्याचे आवाहन
· १५० पेक्षा अधिक पदांसाठी होणार ऑनलाईन मुलाखती
वाशिम, दि. २५ (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ३० सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये उमेदवारांनी सहभाग नोंदविणे व तदनंतर कंपनी किंवा संबंधित आस्थापनांच्या उद्योजक, प्रतिनिधींकडून मुलाखत प्रक्रिया, पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड इत्यादी अनुषंगिक प्रक्रिया वेबपोर्टलवरूनच करण्यात येणार आहे.
या ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये आय.सी.आय.सी. बँक सेल्स अॅकॅडमी, अकोला येथील इनोट्रो मल्टीसर्व्हिसेस प्रा. लि., अमरावती येथील टेक्नोक्रॉफ्ट इंडस्ट्रीज, एस. आय.इंडिया प्रा. लि., पुणे, औरंगाबाद येथील परम स्किल्स ट्रेनिंग प्रा. लि. आदी नामांकित उद्योग, कंपनीमध्ये ऑनलाईन मुलाखतीद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांना रोजगार देणार आहेत. या मेळाव्यात १५० पेक्षा अधिक रिक्त पदे वेबपोर्टलवर अधिसूचित झालेली असून याकरिता किमान ८ वी उत्तीर्ण इतकी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घेण्यासाठी उमेदवारांनी प्राप्त सेवायोजन कार्ड तथा एम्प्लॉयमेंट कार्डचा युझर आय.डी. व पासवर्ड वापरून सहभागी होणे आवश्यक आहे.
www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ‘जॉब सिकर’ (Jobseekr) (find a job) हा पर्याय निवडून आपल्या एम्प्लॉयमेंट कार्डचा युझरनेम व पासवर्ड वापरून लॉगीन करावे. नंतर डाव्या बाजूला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या टॅबवर क्लिक करावे. त्यानंतर वाशिम जिल्हा निवडावा, ‘रोजगार मेळावा २-वाशिम जिल्हा’ दि. २५ ते ३० सप्टेंबर २०२० हा पर्याय निवडावा. त्याठिकाणी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदाखाली ‘अप्लाय’ (Apply) करावे. ‘सक्सेसफुल’ (Successful) हा हिरव्या रंगातील संदेश आल्यास आपण मेळाव्यात सहभागी झाला आहात, असे समजावे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी २५ ते ३० सप्टेंबर २०२० कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे. तसेच काही समस्या असल्यास कार्यालयाच्या ०७२५२-२३१४९४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME