माध्यम प्रतिनिधींची अँटीजेन चाचणी
माध्यम प्रतिनिधींची अँटीजेन चाचणी
भंडारा दि. २५ : मार्च २०२० पासून आपल्या देशात कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव असून कोरोना आजाराची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविणारे माध्यम प्रतिनिधी या दरम्यान हायरिस्क क्षेत्रात वावरत आले आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या पुढाकाराने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत पत्रकारांची अँटीजेन तपासणी आज करण्यात आली.
सामान्य रूग्णालय भंडारा, जिल्हा चिकीत्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माधूरी माथूरकर, डॉ. प्रशांत उईके यांच्या सहकार्याने विश्रामगृह भंडारा येथे माध्यम प्रतिनिधींसाठी अँटीजेन तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीरात 43 पत्रकारांनी सहभाग घेतला असून सर्वांची चाचणी निगेटीव्ह आली आहे. ही चाचणी डॉ. राहूल गजभिये व डॉ. दिनेश मेश्राम यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
मंत्र्यांचे दौरे, बैठका, पत्रकारा परिषदा तसेच कोरोनाचे वृत्तसंकलन करून सर्व सामान्य वाचकांपर्यंत पोचविण्याचे महत्वाचे काम माध्यम प्रतिनिधी करत असतात. कोरोना काळात शासनाने केलेल्या उपायोजना, वेळोवेळी दिलेले दिशा निर्देश व कोरोना रूग्णांबाबतची अद्ययावत आकडेवारी पत्रकारांनी आपल्या प्रेक्षक व वाचकांपर्यंत पोहचविली आहे. अशा काळात त्यांची तपासणी करावी अशी कल्पना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी मांडली असता जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आज शिबिराचे आयोजन करून अँटीजेन तपासणी करण्यात आली. या तपासणीत सर्व प्रतिनिधी निगेटीव्ह आले.
ही तपासणी अतिशय उपयुक्त असून नागरिकांनी मनात कुठलीही भीती न बाळगता अँटीजेन चाचणी करून घ्यावी. ताप, खोकला, घसा खवखव करणे, असे लक्षणं आढळताच आजार अंगावर न काढता नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने तपासणी करावी. तपासणीला उशीर झाल्यास परिस्थिती बिघडत जाते व परिणामी मृत्यू ओढवतो. करिता नागरिकांनी तपासणीसाठी पुढे यावे व चाचणी करून घ्यावी असे आवाहन प्रसार माध्यम प्रतिनिधींनी यावेळी केले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME