पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेसाठी १९ ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेसाठी
१९ ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
वाशिम, दि. २९ : राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेचा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. या योजनेमुळे भाजीपाला पिकांची दर्जेदार व कीडमुक्त रोपे निर्मिती उत्पादनात वाढ होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना प्रयाक्ष रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी २ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर २०२० या कालावधीत ‘महाडीबीटी’ संकेतस्थळावर अथवा तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावेत. लाभार्थ्यांची निवड सोडत पद्धतीने तालुकास्तरावर २७ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी कळविले आहे.
या योजनेमध्ये प्रामुख्याने कृषि पदवी किंवा पदविकाधारक, महिला बचत गटास प्राधान्य देण्यात येणार आहे. योजनेचा कालावधी २ वर्षाचा आहे. योजनेची अंमलबजावणी तालुकास्तरावरून करण्यात येणार आहे. योजनेंतर्गत एकूण प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त २ लक्ष ३० रुपये या प्रमाणात अनुदान देय राहील. पहिल्या टप्प्यात देय अनुदानाच्या ६० टक्के अनुदान व रोपांची विक्री सुरु झाल्यानंतर ४० टक्के अनुदान आधार सलंग्न बँक खात्यात जमा केले जाईल.
या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७ व अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता ३ असे करून १० रोपवाटिका निर्मितीचा लक्षांक असून याअंतर्गत प्रत्येक तालुक्यात किमान १ रोपवाटिका निर्मिती होईल, यादृष्टीने नियोजित आहे. त्यानुसार सर्वसाधारण प्रवर्गासाठी वाशिम तालुक्यात २ तर उर्वरित पाच तालुक्यांमध्ये प्रत्येकी १ रोपवाटिका निर्मिती, तसेच अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता मंगरूळपीर, कारंजा व मानोरा तालुक्यात प्रत्येकी १ रोपवाटिका निर्मितीचा लक्षांक नियोजित आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी २ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर २०२० दरम्यान आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन श्री. तोटावार यांनी केले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME