Skip to main content

यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा

जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

वाशिमदि. १९ : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव शासनाच्या सूचनांचे पालन करून, अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले. गणेशोत्सव पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, मंगरूळपीरच्या नगराध्यक्ष डॉ. गजाला यास्मिन मारुफ खान, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, जयंत देशपांडे, राहुल जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पवन बन्सोड, यशवंत केडगे, संजय पाटील यांच्यासह नगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री मोडक म्हणाले, कोरोना संसर्गाचे काळात सामाजिक बांधिलकी जोपासत जिल्ह्यातील काही गणेशोत्सव मंडळानी यंदा सार्वजनिक स्वरुपात गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे, इतर मंडळानी सुद्धा असा निर्णय घेवून प्रशासनाला सहकार्य करावे. गणेशोत्सव साजरा करतांना शासनाच्या ११ जुलै २०२० रोजीच्या मार्गदर्शक सूचनांचे, तसेच जिल्हास्तरावरून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या आदेशांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. यंदा गणेश आगमन व गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवर बंदी राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक मंडळाने अथवा घरगुती गणपतीच्या आगमानाप्रसंगी मिरवणूक आयोजित करू नये. उत्सव काळात मंडपामध्ये अथवा मंडप परिसरात गर्दी होवू नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, याची खबरदारी संबंधित मंडळाने घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

पोलीस अधीक्षक श्री. परदेशी म्हणाले, गणेशोत्सव काळात प्रतिबंधात्मक आदेशांचे सर्वांनी पालन करावे. कोणत्याही नियमाचे उल्लंघन होवून गणेशभक्तांना, नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

गणेश आगमन विसर्जनाच्या अनुषंगाने विविध बाबींच्या नियोजनाबाबत या सभेत चर्चा झाली.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू