तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीचा सोयाबीनवरील प्रादुर्भाव नियंत्रणासाठी उपाययोजना करा · कृषि विभागाचे आवाहन
तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीचा सोयाबीनवरील प्रादुर्भाव नियंत्रणासाठी उपाययोजना करा · कृषि विभागाचे आवाहन वाशिम, दि. १७ : जिल्ह्यात १० ऑगस्ट पासून सतत ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस पडत असून सोयाबीन कायिक वाढ मोठ्या प्रमाणावर झाली आहे. पीक फुलोरा व शेंगा धरण्याच्या अवस्थेत असून सध्याच्या वातावरणात सोयाबीन पिकावर तंबाखूची पाने खाणाऱ्या (स्पोडोप्टेरा लिटूरा) अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ह्या अळीवर नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे. सध्या सतत पाऊस सुरु असून वातावरण ढगाळ आहे, तसेच कृष्णपक्ष पंधरवडा आहे. तंबाखूची पाने खाणारी (स्पोडोप्टेरा) एक मादी पतंग अमावस्येपूर्वी सोयाबीन पिकांच्या पानाच्या खालच्या बाजूला २०० ते ३०० अंडी घालते, तीन ते चार दिवसांत अंड्यातून बारीक अळ्या बाहेर पडून पानातील हरितद्रव्य खाऊन पानाची चाळण करतात. ही अळी पहिल्या व दुसऱ्या अवस्थेत सहज नजरेस पडत नाही. तिसऱ्या अवस्थेतील अळीचा प्रादुर्भाव सहज ओळखता येतो. अशावेळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असते. सोयाबीन पीक फुल व शेंगा धरण्याच्या अवस्थेत असतांना तंबाखूची पाने खाणारी अळी आपला मोर्चा फुले व शेंगांकडे वळवून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. या अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात रहावा, याकरिता शेतामध्ये एकरी ८ ते १० कामगंध सापळे लावावे. सापळ्यामध्ये नर पतंग आकर्षिले जाऊन काही प्रमाणात किडीचे नियंत्रण होण्यास मदत होईल. रासायनिक फवारणी करण्यासाठी ४ ग्रॅम इमामेक्टीन बेन्झोल्ट, ३ मिली क्लोरॅनट्रानिप्रोल १८.५ इ.सी. अथवा २० मिली क्लोरोपायरीफॉस यापैकी कोणतेही एक कीटकनाशक १० लिटर पाण्यात घेवून फवारणी करावी. पेट्रोलच्या फवारणी पंपाने फवारणी करतांना बहुतेक शेतकरी एकरी ५० ते ६० लिटर पाणी म्हणजेच एकरी ५ ते ६ पंप द्रावण वापरतात. परंतु, शास्त्रीयदृष्ट्या प्रति एकर १०० लिटर पाण्यातील द्रावण फवारणी करणे म्हणजेच एकरी १० पंप द्रावण फवारणीसाठी वापरणे आवश्यक आहे. पिकांची कायिक वाढ जास्त झाल्याने व अतिदाट किंवा शिफारशी प्रमाणे ४५ से. मी. पेक्षा दोन ओळीतील अंतर कमी ठेवल्यास फवारणी करतांना अडचणी येतात. फवारणी पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. कृषि विभागाच्या आवाहनानुसार सोयाबीन पिकांची रुंदी व वरंभा पद्धती, पट्टा पद्धतीने किंवा दोन ओळीत ४५ से.मी. अंतर ठेवून लागवड केलेल्या शेतकऱ्यांना ह्या अडचणी येणार नाहीत. शेंगावरील करपा रोगावर नियंत्रणासाठी उपाययोजना शेंगामध्ये दाने भरण्याच्या अवस्थेत शेंगावरील करपा हा रोग येण्याची शक्यता जास्त असते. या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी २५ ग्रॅम कॉपर ऑक्झीक्लोराईन १० लिटर पाण्यात घेवून फवारणी करावी. काही भागात सोयाबीन पिकाची सर्व पाने पिवळी पडताना आढळून येत आहेत. हा रोग विषाणूजन्य असून याचा प्रसार जमिनीतून किंवा बियाण्याद्वारे होतो. या विषाणूजन्य रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे झपाट्याने होत असल्याने पांढऱ्या माशीचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. शेतातील अशी पिवळी झालेली झाडे उपटून नष्ट करावीत, जेणेकरून रोगाचा प्रसार होणार नाही, असे श्री. तोटावार यांनी कळविले आहे. *****
|
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME