जिल्ह्यात कोरोना विषयक चाचण्यांसाठी विशेष मोहीम
- जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक
वाशिम, दि. २० (जिमाका) : जिल्ह्यात कोरोना विषयक चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून विशेष मोहीम राबवून कोरोना बाधितांचा शोध घेतला जाणार आहे. या अंतर्गत सर्व व्यापारी, दुकानदार व व्यावसायिकांची कोरोना विषयक चाचणी करण्यात येणार आहे. तसेच लक्षणे असलेलेल्या नागरिकांची सुद्धा चाचणी करण्यात येणार असून व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी स्वतःची चाचणी करून घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधितांचा शोध घेवून त्यांचे अलगीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. आरटीपीसीआर टेस्ट सोबतच रॅपिड एँटिजेन टेस्टवरही भर दिला जात आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व दुकानदार, व्यापारी, औषध विक्रेते, फळे व भाजीपाला विक्रेते, दुध विक्रेते, सलून चालक यासह इतर सर्व व्यावसायिकांची कोरोना विषयक चाचणी करण्यात येणार आहे. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या हितासाठी जिल्ह्यातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांना आपली कोरोना विषयक चाचणी करून घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी केले आहे.
लवकर निदान, उपचाराने रुग्ण बरा होण्याची शक्यता अधिक
कोरोना विषाणू संसर्गाचे लवकर निदान व उपचार झाल्यास रुग्ण बरे होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे ताप, सर्दी, कोरडा खोकला, घसा दुखणे, जिभेची चव जाणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी स्वतःहून आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकरी श्री. मोडक यांनी केले आहे. प्रत्येक तालुक्यात कोरोना विषयक चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. कोरोना विषयक लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना आरोग्य विषयक मदत हवी असल्यास त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या ८३७९९२९४१५ या व्हॉटस्अप हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
खालील ठिकाणी कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध
१. जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम
२. उपजिल्हा रुग्णालय, कारंजा लाड
३. अनुसूचित जाती मुलांची निवासी शाळा, सवड, ता. रिसोड
४. अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह, तुळजापूर, ता. मंगरुळपीर
५. ग्रामीण रुग्णालय, मालेगाव
६. ग्रामीण रुग्णालय, मानोरा
*****
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME