जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणाला प्राधान्य- पालकमंत्री शंभूराज देसाई वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य ध्वजारोहण सोहळा
वाशिम, दि. १५ : सध्या जगभर कोरोना संसर्गाच्या संकटाने थैमान घातले आहे. आपल्या वाशिम जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देवून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. कोरोनाच्या संकटातून जिल्ह्याला बाहेर काढण्यासोबतच आगामी काळात सर्व घटकांच्या समतोल विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन गृह (ग्रामीण ), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते.यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, अपर जिल्हाधिकारी शरद पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, राजेंद्र जाधव, सुहासिनी गोणेवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह विविध शासकीय विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, बाधितांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात कोरोना विषयक चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. वाशिम येथे लवकरच आरटी-पीसीआर प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. सध्या कोविड केअर सेंटर व कोविड हॉस्पिटलच्या माध्यमातून जिल्ह्यात १७१० खाटांची सुविधा उपलब्ध आहे. आवश्यकता भासल्यास आणखी खाटांची संख्या वाढविण्याची तयारी आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ३ कोटी ३९ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील उपाययोजनांसाठी राष्ट्रीय आरोग्य मिशन, आपत्ती व्यवस्थापन व जिल्हा नियोजन समितीमधून सुमारे ७ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असल्याचे त्यांनी सांगितले.अंगणवाडीसेविका,आरोग्य सेविका, आशावर्कर, डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, होमगार्ड, सफाई कामगार, महसूल व इतर विभागानाचे अधिकारी, कर्मचारी जीवाची पर्वा न करता कोरोना प्रतिबंधासाठी लढत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले.
कोरोनाप्रतिबंधासाठी सुरुवातीला टाळेबंदीचा निर्णय घ्यावा लागला. या काळात गरजू व वंचित घटकांना रेशनच्या माध्यमातून एप्रिल ते जुलै या काळात एकूण ४१ हजार ९०६ मेट्रिक टन धान्य वितरण करण्यात आले. यापैकी २२ हजार ७६९ मेट्रिक टन धान्य हे नियमित योजनांमधील होते, तर १९ हजार ३४८ मेट्रिक टन अतिरिक्त धान्य वाटप करण्यात आले. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेच्या माध्यमातूनही गोरगरिबांसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आली. टाळेबंदी काळात शिवभोजन थाळीचा दर १० रुपयांवरून ५ रुपये करण्यात आला. एप्रिलपासून जुलै अखेरपर्यंत १ लक्ष ७५ हजार १३१ थाळी वितरीत करण्यात आल्या आहेत, असे पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले.
कोरोनाच्या संकटकाळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल कृषि विभागाच्या सहाय्याने थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यात आला. सुमारे ६ कोटी ९७ लक्ष रुपये किंमतीचा २ हजार ७६७ मेट्रिक टन भाजीपाला, फळांची विक्री याकाळात विक्री झाली. टाळेबंदी काळात कृषि विभागामार्फत ६९० गावातील २८ हजार ७४९ शेतकऱ्यांना बांधावरच बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात आले. त्याची किंमत ४० कोटी २४ लक्ष रुपये इतकी होती. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे वाहतुकीवरील २६ लक्ष ३० हजार रुपयांची बचत झाली आहे.
शेतमालाची खरेदी-विक्री नियमित सुरु राहण्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समित्या सुरू होत्या. या काळात शासकीय आधारभूत किंमतीने १ लक्ष ९ हजार क्विंटल तूर आणि ८६ हजार ७५७ क्विंटल चना खरेदी करण्यात आला. जिल्ह्यात यंदा शासकीय खरेदी केंद्रांवर विक्रमी २ लक्ष ६९ हजार ७०५ क्विंटल कापसाची खरेदी झाली. त्यापोटी शेतकऱ्यांना सुमारे १३६ कोटी ६ लक्ष रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले. त्यामुळे लॉक डाऊन कालावधीमध्ये शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला असल्याचे पालकमंत्री श्री. देसाई यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी कर्जमुक्ती
नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्याठी राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या योजनेतून आतापर्यंत जिल्ह्यातील ८३ हजार २१३ शेतकऱ्यांना ५३४ कोटी ८७ लाख रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. गतवर्षी परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि नैसर्गिक आपत्ती विभागाकडून एकूण ३५३ कोटी ६३ लक्ष रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. खरीप हंगामात शेतकरी बांधवांना पतपुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश आले होते. त्यानुसार ८६ हजार ७१८ शेतकऱ्यांना ६१७ कोटी ६० लक्ष रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण झाले आहे, असे पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
वाशिम येथे स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारणार
शेतीतील उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे काळाची गरज आहे. याकरिता वाशिम येथे स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. या साठी जिल्हा नियोजन समितीमधून २ कोटी ५० लक्ष रुपये निधी मंजूर केला आहे. तसेच जिल्ह्यात ८ शेतकरी चेतना केंद्रांसाठी सुद्धा २ कोटी ४० लक्ष रुपये मंजूर केले आहेत. पहिल्या टप्प्यात १ कोटी ६० लक्ष रुपये कृषि विभागास उपलब्ध करून दिले आहेत, असे पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले. पोहरादेवी विकास आराखड्याची कामे गतीने सुरु आहेत. मार्च २०२० अखेरपर्यंत ११ कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. या कामांसाठी शासनाने नुकताच ७ कोटी ५० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याचे ते म्हणाले.
ग्रामीण रस्त्यांसाठी यंदा भरीव तरतूद
जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांच्या दर्जा सुधारण्यासाठी यावर्षी जिल्हा वार्षिक योजनेमध्ये भरीव तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरणासाठी गेल्या चार वर्षात मिळून १४ कोटी रुपये तरतूद करण्यात आली होती. मात्र यंदा एकाच वर्षात १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरणासाठी गेल्या चार वर्षात मिळून १२ कोटी रुपये तरतूद करण्यात आली होती. मात्र यंदा एकाच वर्षात ११ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
सर्वांना सोबत घेवून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार
कोरोनाच्या संकटातून जिल्ह्याला बाहेर काढून विकास कामांना गती द्यायची आहे. याकरिता जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासन यांना सोबत घेवून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार करणार असल्याचे पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले. तसेच सध्या जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच आपल्यापासून इतरांना संसर्ग होणार नाही, याबाबत दक्ष राहावे. आपण सर्वजण सांघिकपणे प्रयत्न करून या संकटावर नक्कीच मात करू, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
*****
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME