रिसोड , मंगरूळपीर लॉक डाऊन सुधारित आदेश.
रिसोड, मंगरूळपीर शहरातील दुकाने, आस्थापना
सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा
वाशिम, दि. २१ (जिमाका) : मंगरूळपीर व रिसोड शहरात १५ ते २१ जुलै दरम्यान संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते. २२ जुलैपासून या दोन्ही शहरातील लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. जिल्ह्यातील उर्वरित चार शहरांप्रमाणेच या दोन्ही शहरातही ३१ जुलै २०२० पर्यंत यापूर्वी परवानगी दिलेली दुकाने, आस्थापना, सेवा सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज निर्गमित केले आहेत. सर्व दवाखाने (पशुवैद्यकीयसह), मेडिकल २४ तास सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.
रिसोड नगरपालिका (निजामपूर, घोन्सर , सवड गावांसह) हद्दीत आणि मंगरूळपीर नगरपालिका (जांब ग्रामपंचायतमधील सोनखास, मुर्तीजापूर, शहापूर, शेलगाव या गावांसह) हद्दीत २२ जुलै ते ३१ जुलै २०२० (दोन्ही दिवस धरून) या दरम्यान यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना, प्रतिष्ठाने, सेवा सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील. दवाखाने, मेडिकल स्टोअर २४ तास सुरु राहतील. सहाही शहरांमध्ये केवळ दुध संकलनास सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा राहणार आहे. मात्र, या काळात दुध विक्री करण्यास मनाई राहील.
महामार्गांची कामे नेहमीप्रमाणे सुरु ठेवता येतील. सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालये त्यांच्या कार्यालयीन वेळेत सुरु राहतील. बँका सकाळी ८ ते २ वा. दरम्यान कामकाजासाठी सुरु राहतील. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सकाळी ८ ते दुपारी २ वा. दरम्यान सुरु ठेवण्यास मुभा राहील. या आदेशानुसार मुभा देण्यात आलेल्या बाबींसाठी परवानगी अथवा पासेसची आवश्यकता राहणार नाही. मास्क, सॅनिटायझरचा वापर यापूर्वी प्रमाणेच बंधनकारक राहील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME