दुकाने, आस्थपाना सकाळी १० सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार
दुकाने, आस्थपाना सकाळी १० सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार
· आजपासून सुधारित नियमावली लागू
· आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची सुविधा सुरु राहणार
वाशिम, दि. ३१ : जिल्ह्यात ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत लॉकडाऊन लागू राहणार असून याबाबतची सुधारित नियमावली १ ऑगस्ट २०२० पासून लागू करण्यात येत आहे. जिल्ह्यात यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना, सेवा सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच दवाखाने (पशुवैद्यकीय दवाखान्यांसह), मेडिकल स्टोअर्स २४ तास सुरु राहतील. मात्र, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास अथवा अशा ठिकाणी गर्दी आढळून आल्यास या आस्थापना, दुकाने बंद करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.
नवीन नियमावलीनुसार कृषि उत्पन्न बाजार समितीमधील सर्व प्रकारची कामे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहतील. दुध संकलन व विक्री, भाजीपाला बाजार सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु ठेवता येईल. सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत केवळ दुध संकलनास मुभा राहील, याकाळात दुध विक्री करता येणार नाही. पिण्याचे पाणी, घरगुती गॅस घरपोच करण्यास सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुभा राहील. जिल्ह्यातील नगरपालिका हद्दीतील पेट्रोलपंप सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत, तर नगरपालिका हद्दीबाहेरील पेट्रोलपंप २४ तास सुरु ठेवता येतील. सर्व बँका सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहतील. महामार्गांची कामे पूर्वीप्रमाणे सुरु राहतील. वृत्तपत्र छपाई व वितरण आवश्यक खबरदारी घेवून करता येईल.
लग्न समारंभ, अंत्यविधीसाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाच्या अधीन राहून जास्तीत जास्त २० व्यक्तींना परवानगी राहील. लग्न समारंभाचा कार्यक्रम वगळता इतर सामुहिक भोजनाच्या कार्यक्रमास बंदी राहील. खुल्या मैदानावर, लॉन्सवर, वातानुकुलीत नसलेल्या हॉलमध्ये २० व्यक्तींच्या मर्यादेत लग्नसोहळा संबंधित कार्यक्रम शासनच्या २३ जून २०२० रोजीच्या आदेशाच्या अधीन राहून करता येतील.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME