बकरी ईदची नमाज घरीच अदा करा
बकरी ईदची नमाज घरीच अदा करा
वाशिम, दि. ३१ : कोविड १९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता घरीच अदा करावी, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकरी हृषीकेश मोडक यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.
जिल्ह्यामध्ये सध्या जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांनी जनावरे खरेदी करावयाची असल्यास ऑनलाईन पद्धतीने अथवा दूरध्वनीद्वारे जनावरे खरेदी करावी. शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये (कन्टेमेंट झोन) लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईदनिमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये.
कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित स्थानिक प्रशासन, पोलीस, नगरपालिका यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच शासनामार्फत वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या सूचनांचे देखील अनुपालन करावे, असे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME