वाशिम येथील महेश भवनमध्ये खासगी संस्थात्मक विलगीकरण केंद्र मंजूर
- Get link
- X
- Other Apps
वाशिम येथील महेश भवनमध्ये
खासगी संस्थात्मक विलगीकरण केंद्र मंजूर
· २० खोल्यांची सशुल्क सुविधा उपलब्ध
· स्त्राव नमुने घेतलेल्या व्यक्तींसाठी राहण्याची सुविधा
वाशिम, दि. ३१ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्ग विषयक चाचणीसाठी घशातील स्त्राव नमुने घेतल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त होईपर्यंत संस्थात्मक विलगीकरणात राहण्यासाठी खासगी संस्थात्मक विलगीकरण केंद्र म्हणून वाशिम येथील महेश भवन अधिसूचित करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी निर्गमित केले आहेत. याठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींना सशुल्क स्वरुपात नाष्टा, भोजन आदी सुविधा पुरविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कोरोना बाधितांची चाचणी होवून त्यांचे अलगीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषयक चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. चाचणीसाठी घशातील स्त्राव नमुने घेतल्यानंतर त्याविषयीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधित व्यक्तींना सध्या शासकीय संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येते. या चाचणीचे अहवाल प्राप्त होण्यासाठी किमान २४ तासांचा कालावधी लागतो. चाचण्यांची वाढलेली संख्या पाहता नागरिकांच्या विलगीकरणाची अतिरिक्त सुविधा निर्माण व्हावी, यासाठी वाशिम येथील महेश भवन हे काही अटी व शर्तींच्या अधीन राहून खासगी संस्थात्मक विलगीकरण केंद्र म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे. महेश भवन या खासगी संस्थात्मक विलगीकरण केंद्रात स्वतंत्र शौचालय, स्नानगृह असलेल्या २० खोल्यांची सुविधा उपलब्ध आहे. घशातील स्त्राव नमुने घेवून अहवाल प्राप्त होईपर्यंत याठिकाणी व्यक्तींना राहता येईल.
महेश भवन या खासगी संस्थात्मक विलगीकरण केंद्रात निवास व्यवस्थेसह भोजन, नाष्टा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, साफ-सफाई आदी सर्व सुविधा सशुल्क राहील. या केंद्रामध्ये दाखल व्यक्तीला गंभीर लक्षणे आढळून आल्यास अशाप्रसंगी त्या व्यक्तीच्या देखभालीसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, याकरिता खासगी संस्थात्मक विलगीकरण केंद्रामार्फत वैद्यकीय व्यवसायांची सेवा सलंग्न करण्यात यावी, तसेच सदर व्यक्तीस आवश्यकतेनुसार जिल्हा सामान्य रुग्णालय अथवा इतर रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेची तजवीज करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रात भरती असलेल्या संशयित कोविड रुग्णांच्या राज्य शासनाच्या नियमानुसार सर्व तपासण्या करून घेणे संबंधित केंद्र चालकांना बंधनकारक राहणार आहे.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे मनुष्यबळ, सफाई कर्मचारी आदी व्यवस्थापन करण्यात यावे. केंद्रामध्ये आकारण्यात येणाऱ्या दराचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावे. तसेच कमीतकमी दारामध्ये रुग्णांना निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी. त्यामध्ये रुग्णांचे राहणे, जेवण, स्वच्छता, रुग्णवाहिका, आवश्यकतेनुसार वैद्यकीय सेवा आदी सर्व बाबी पुरविण्यात याव्यात. इमारतीमध्ये कोणताही जैविक अथवा उपचारार्थ वापरात आलेला कचरा किंवा इतर वस्तू, इतर साहित्य न टाकणे, तसेच दैनंदिन स्वच्छता राखणे, केंद्राच्या परिसराचे दोन वेळा निर्जंतुकीकरण करणे, सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील, असे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.
*****
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME