सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बँका सुरु राहणार



बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही आता

बँकेत विमा हप्ता भरण्याची सुविधा

-         जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

·        पीक विमा योजनेच्या कामात दिरंगाई केल्यास बँकांवर प्रशासकीय कारवाई

·        ३१ जुलैपर्यंत बँकांची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

वाशिम, दि. २७ (जिमाका) : जिल्ह्यात सन २०२०-२१ खरीप हंगामसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. ३१ जुलै ही विमा हप्ता सादर करण्याची अंतिम मुदत असून कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांसोबतच बिगर कर्जदार शेतकऱ्यालाही बँकेत विमा हप्ता भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व बँकांची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहणार असून या कालावधीत पीक विमा हप्ता स्वीकारला जाणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले.

सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद व खरीप ज्वारी पिकाचा प्रधानमंत्री विमा पीक योजनेत समावेश असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील सर्व मंडळांना ही योजना लागू आहे. तसेच अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्ट्याने जमीन करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी पात्र आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी विहित प्रपत्रात नजीकच्या सामुहिक सुविधा केंद्र, महा ई-सेवा केंद्र व बँकेकडे विमा हप्ता सादर करणे आवश्यक आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील १२ हजार २४८ बिगर कर्जदार व १ लक्ष ३७ हजार ८७० कर्जदार शेतकरी असे एकूण १ लक्ष ५० हजार ११८ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजने सहभाग घेतला आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२० पर्यंत असून उर्वरित शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता यावे, यासाठी बँकेद्वारे विमा हप्ता स्वीकारण्याचा कालावधी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात आला आहे. या कालावधीत बँकेत येणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांसोबतच बिगर कर्जदार शेतकऱ्यांचाही विमा हप्ता स्वीकारण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. याबाबत कोणत्याही बँकांनी दिरंगाई केल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बचत खाते असलेल्या बँकेतून विमा हप्ता भरता येणार

कर्जदार शेतकऱ्यांचा विमा प्रस्ताव संबधित बँकेमार्फत सादर करता येतो. मात्र, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सुद्धा बँकेमार्फत विमा हप्ता सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार विमा योजनेत सहभागी असलेले शेतकरी त्यांचे बचत खाते ज्या बँकेत आहे, त्या बँकेमध्ये आपला पीक विमा हप्ता ३१ जुलै २०२० पर्यंत सादर करू शकतील. गावांमध्ये महा ई-सेवा केंद्र, सामुहिक सुविधा केंद्र कार्यान्वित नसल्यास अथवा विमा पोर्टल बंद असल्यास शेतकऱ्यांना बँकेत विमा हप्ता सादर करता येणार आहे. मात्र, सदर बँकेत संबंधित शेतकऱ्याचे बचत खाते असणे बंधनकारक आहे.

सामुहिक सुविधा केंद्र रात्री १० वाजेपर्यंत सुरु

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी विमा हप्ता सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२० पर्यंत आहे. या योजनेपासून शेतकरी वंचित राहू नयेत, याकरिता जिल्ह्यातील सर्व महा ई-सेवा केंद्र, सामुहिक सुविधा केंद्र रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. याबाबतचे आदेशी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी यापूर्वीच निर्गमित केले आहेत.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून गतवर्षी १४७ कोटी रुपयांची भरपाई

गतवर्षी २०१९-२० मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत २ लक्ष ९६ हजार शेतकरी सहभागी झाले होते. यापैकी १ लक्ष ४८ हजार शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी १४५ कोटी रुपये, ८ हजार १४२ शेतकऱ्यांना तूर व कापूस पिकासाठी २ कोटी ६ लक्ष रुपये तसेच उडीद व मुग पिकासाठी १० हजार शेतकऱ्यांना ७९ लक्ष रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. यंदा सद्यस्थितीत पीक परिस्थिती उत्तम आहे. मात्र प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मिळणारे विमा संरक्षण हे सदर पीक पेरणीपासून ते पीक काढणी पश्चातपर्यंत लागू आहे. त्यामुळे दुर्दैवाने भविष्यात एखादी नैसर्गिक आपत्ती येवून पिकांचे नुकसान झाल्यास व उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न आल्यास त्याची भरपाई विमा योजनेतून मिळेल. त्यामुळे यावर्षीही जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेविषयी अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी वाशिम तालुका विमा प्रतिनिधी गजानन शिंदे (भ्रमणध्वनी क्र. ७४९९२७३१५३), रिसोड तालुका प्रतिनिधी निलेश गरड (भ्रमणध्वनी क्र. ९५४५४२५८७०), मालेगाव तालुका प्रतिनिधी महादेव जगताप (भ्रमणध्वनी क्र. ७०८३५३०३८३), मंगरूळपीर अर्जुन पवार (भ्रमणध्वनी क्र. ७०३८७००४४९), मानोरा तालुका प्रतिनिधी भूषण लाहे (भ्रमणध्वनी क्र. ८४५९८४४३१५), कारंजा लाड तालुका प्रतिनिधी मंगेश घुले (भ्रमणध्वनी क्र. ९७६७३५९९०९) यांच्याशी तसेच तालुका कृषि अधिकारी, क्षेत्रीय कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

पीकनिहाय पीक विमा योजनेच हप्ता खालीलप्रमाणे आहे

पिकाचे नाव

विमा संरक्षित

रक्कम रु.(प्रति हेक्टर)

शेतकऱ्यांनी भरावयाचा

पीक विमा हप्ता

सोयाबीन 

४५,०००/-

९००/-

कापूस

४३,०००/-

२१५०/-

तूर

३१,५००/-

६३०/-

मुग व उडीद

१९,०००/-

३८०/-

खरीप ज्वारी

२५,०००/-

५००/-

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू