महा ई-सेवा केंद्र, सामुहिक सुविधा केंद्र रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा
महा ई-सेवा केंद्र, सामुहिक सुविधा केंद्र
रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा
वाशिम, दि. २२ (जिमाका) : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी विमा हप्ता व प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२० पर्यंत असून जिल्ह्यातील सर्व महा ई-सेवा केंद्र, सामुहिक सुविधा केंद्रावर पीक विमा प्रस्ताव व विमा हप्ता भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेपासून शेतकरी वंचित राहू नयेत, जिल्ह्यातील सर्व महा ई-सेवा केंद्र, सामुहिक सुविधा केंद्र रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. याबाबतचे आदेशी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी २१ जुलै रोजी निर्गमित केले आहेत.
सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद व खरीप ज्वारी पिकाचा प्रधानमंत्री विमा पीक योजनेत समावेश असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील सर्व मंडळांना ही योजना लागू आहे. तसेच अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्ट्याने जमीन करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी पात्र आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी विहित प्रपत्रात नजीकच्या सामुहिक सुविधा केंद्र व बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत सातबारा, आधारकार्ड, पिक पाहणी झाली असल्यास पिकांची पेरणीबाबतचे स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांचे संबंधित बँकेत खाते असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
या नुकसानीलाही मिळणार भरपाई
प्रधानमंत्री पीक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर विमा संरक्षण लागू करण्यात आले आहे. पिकास दुष्काळ, पूर, भूस्खलन, चक्रीवादळ, अतिवृष्टी, कीड, रोगराई, पावसातील खंड, नैसर्गिक आग, वीज कोसळणे इत्यादीमुळे होणारे नुकसान हे विमा कंपनी व राज्य शासनाचे अधिकारी यांच्या संयुक्त पाहणीनुसार विमा कंपनीमार्फत वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानीचे प्रमाण व द्यावयाची नुकसान भरपाई ठरविली जाईल. जर अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे अपेक्षित उत्पन्न हे त्या पिकांच्या उंबरठा उत्पन्नाच्या ५० टक्केपेक्षा कमी असेल तर सर्व अधिसूचित विमा क्षेत्र हे त्या मदतीसाठी पात्र राहील.
पीकनिहाय पीक विमा योजनेच हप्ता खालीलप्रमाणे आहे
पिकाचे नाव
विमा संरक्षित
रक्कम रु.(प्रति हेक्टर)
शेतकऱ्यांनी भरावयाचा
पीक विमा हप्ता
सोयाबीन
४५,०००/-
९००/-
कापूस
४३,०००/-
२१५०/-
तूर
३१,५००/-
६३०/-
मुग व उडीद
१९,०००/-
३८०/-
खरीप ज्वारी
२५,०००/-
५००/-
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME