शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एकबुर्जी धरणाची उंची वाढवा
शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एकबुर्जी धरणाची उंची वाढवा
वंचित बहूजन आघाडीची मुख्यमंत्र्यांना मागणी
प्रदेश सदस्या सौ. किरणताई गिर्हे यांचा पुढाकार
वाशिम - (युगनायक न्यूज नेटवर्क ) शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे एकबुर्जी धरणातुन वाशिमकरांना पुरेसे पिण्याचे पाणी मिळत्र नाही. त्यात उन्हाळ्याच्या दिवसात ही पाणीटंचाई तीव्र स्वरुपात निर्माण होत असल्यामुळे नागरीकांना नाईलाजाने विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. या पाणीटंचाईच्या समस्येवर मात करुन नागरीकांना दिलासा देण्यासाठी एकबुर्जी धरणाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी वंचित बहूजन आघाडीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. ५ मे रोजी वंचितच्या प्रदेश सदस्या सौ. किरणताई गिर्हे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष डॉ. गजानन हुले, जिल्हा महासचिव सोनाजी इंगळे, जिल्हासचिव उत्तम झगडे, तालुकाअध्यक्ष नारायण खोडके, बालाजी राऊत, अनिल कांबळे, जिल्हा सचिव वसंतराव हिवराळे, तालुका महासचिव संजय पडघान, तालुका उपाध्यक्ष प्रविण मोरे, किशोर खडसे, शालीग्राम खडसे, उमेश राऊत यांची उपस्थिती होती.
निवेदनात नमूद आहे की, सध्यस्थितीला वाशिम शहराची लोकसंख्या १,२४,४६५ आहेत. त्यापैकी ७१८१६ पुरुष व ५२६४९ अशी आहे. एकबुर्जी, सोनल, अडाण मध्यम प्रकल्प आहेत तर १३१ लघुसिंचन प्रकल्प आहेत. वाशिम शहराची तहान भागविण्यासाठी तसेच शेतकर्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी एकबुर्जी प्रकल्पाची उंची वाढविण्याची मागणी गेल्या १५ वर्षापासून वाशिमकरांच्या वतीने करण्यात येत आहे. याबाबत अनेक नागरीकांना शासनाला निवेदनेही दिली आहेत. मात्र, तांत्रिक बाबी समोर करून हा एकबुर्जीची उंची वाढविण्याचा प्रस्ताव लालफितशाहीत गुंडाळून ठेवण्यात आला आहे. तत्कालिन नगराध्यक्ष स्व. रामचंद्र राठी यांच्या कार्यकाळात सन १९६४ साली एकबुर्जी प्रकल्प उभारण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांनी यासाठी निधी मंजुर केला होता. तेव्हापासून आजतागायत या प्रकल्पातूनच वाशिम शहराला पाणीपुरवठा सुरू असून नजिकच्या अनेक खेड्यांमधील शेतकर्यांना सिंचनासाठी पाणी पुरविले जात आहे. मात्र गेल्या काही वर्षांत वाशिम शहराचा झपाट्याने विस्तार होण्यासोबतच लोकसंख्याही भरमसाठ वाढली व सिंचनाची गरजही वाढली आहे. त्यातुलनेत मात्र पाणीपुरवठा करण्याकामी एकबुर्जी प्रकल्प कुचकामी ठरत असल्याने प्रकल्पाची उंची वाढविणे गरजेचे ठरत आहेत. याकडे शासनाने विशेष लक्ष पुरवून हा प्रश्न मार्गी लावावा अशी जनतेची मागणी आहे.
मागील १५ वर्षांपासून वाशिमची जनता सातत्याने शासनाकडे ही मागणी करत आहे. मात्र वाशिमकरांच्या मागणीला शासन व लोकप्रतिनिधींकडून प्रत्येक वेळेला वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात येत आहेत. आजघडीला एकबुर्जी धरण वाशिमकरांची तहान भागविण्यासाठी असमर्थ असल्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात वाशिमकरांना पाण्याची टंचाई भेडसावत आहे. तसेच शहराच्या काही भागात बाराही महिने नागरीकांना १० ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा केल्या जात आहे. जिल्हयातील लोकप्रतिनिधी मात्र आपल्या राजकारणात मग्न असून वाशिमकरांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर मौन धारण करुन आहेत. एकबुर्जी धरणाची उंची सध्या २३.७ मीटर असून त्यात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता १४.१ एमसीएम इतकी आहे. या धरणाची उंची २४.७ मीटर केल्यास म्हणजे एक मीटर वाढविल्यास वाशिमकर जनतेची तहान वर्षभर मिटेल यात शंका नाही. सद्यस्थितीला वाशिमकर जनतेला १० ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. तसेच गढुळ व दुषित पाण्यामुळे नागरीकांच्या आरेाग्याला धोका निर्माण झाला आहे. पिण्याचे अपुरे पाणी मिळुनही वाशिमकर जनतेकडून वर्षभराचा पाणीकर नगर परिषदेकडून वसुल केला जातो. ही अन्यायकारक बाब असून वाशिमकरांना पुरेसे पिण्याचे पाणी व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एकबुर्जी धरणाची उंची वाढविणे हाच यावर एकमेव उपाय आहे. या बाबींचा गांभिर्याने विचार करुन एकबुर्जी धरणाच्या उंची वाढविण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME