जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक
जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक
इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक
• जाहिरात प्रमाणीकरणासाठी जिल्हास्तरावर समिती गठीत
वाशिम, दि. २० (युगनायक न्युज नेटवर्क) : जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीच्या ध्वनिफीत, चित्रफित, सीडी इत्यादी साहित्याची तपासणी करून दूरचित्रवाणी आणि रेडीओ, केबल नेटवर्कवरून प्रसारित करावयाच्या जाहिराती प्रसारित करण्यापूर्वी प्रमाणित करुन घेणे बंधनकारक आहे. या जाहिरातींचे प्रमाणीकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीमध्ये अपर जिल्हाधिकारी, सर्व मतदार विभाग, निर्वाचक गणांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचा समावेश असून जिल्हा माहिती अधिकारी हे समितीचे सदस्य सचिव आहेत. जाहिरातींचे प्रमाणिकरण करण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात प्रसारीत करण्याच्या पाच दिवस अगोदर सदर जाहिरातीची सी. डी. आणि संहिता (स्क्रिप्ट) दोन प्रतीत विहित नमुन्यातील अर्जासोबत समितीकडे सादर करणे आवश्यक आहे.
अर्जामध्ये जाहिरात तयार करण्यासाठी केलेला खर्च आणि प्रस्तावित जाहिरात प्रसारित करण्यासाठी येणारा अंदाजे खर्च आणि त्यामध्ये जाहिरात प्रत्येक दिवशी किती वेळा दाखविण्यात येणार आहे, प्रत्येकवेळी ती जाहिरात दाखविण्यासाठी येणारा खर्च नमूद करावा. तसेच सदर जाहिरात कोणत्या उमेदवारासाठी देण्यात येणार आहे, ते स्पष्ट नमूद करावे. जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीमधील कक्ष क्र. २०२, दुसरा माळा येथील जिल्हा माहिती कार्यालयामध्ये जाहिरात प्रमाणीकरणसाठीच्या अर्जाचे विहित नमुने उपलब्ध असून याच ठिकाणी अर्ज स्वीकारले जातील.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME