घरकुलसंदर्भातील प्रस्तावांना प्राधान्याने मार्गी लावा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार


घरकुलसंदर्भातील प्रस्तावांना प्राधान्याने मार्गी लावा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याला आढावा घेण्याचे निर्देश



 चंद्रपूर, दि. 20 सप्टेंबर : आपले हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाला वाटते. ‘सर्वांसाठी घरे’ योजनेंतर्गत घरकुल उपलब्ध करून देण्याला शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार घरकुलासंदर्भात आलेल्या प्रस्तावांना त्वरीत निकाली काढून गरजूंना घरकुलाचा लाभ द्यावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात घरकुल योजनेचा आढावा घेतांना ते बोलत होते. घरकुल हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असून लाभार्थ्यांला हक्काचे घर मिळणे, हा त्याचा अधिकारसुध्दा आहे. घरकुल मंजूर होण्यासाठी स्थानिक स्तरावर सोपी पध्दत अवलंबिणे आवश्यक आहे. विनाकारण मंजूरीची फाईल या विभागातून त्या विभागात महिनोमहिने फिरत असते. त्यामुळे लाभार्थ्यांना मनस्ताप होतो. घरकुलासंदर्भात आपल्याकडे आलेली फाईल प्राधान्याने निकाली काढा. अधिकारी जेवढ्या लवकर त्यावर निर्णय घेईल, तेवढ्या लवकर तो प्रस्ताव मंजूर होऊन लाभार्थ्यांला दिलासा मिळेल.

पुढे पालकमंत्री म्हणाले, घरकुलासाठी गावागावात उपलब्ध असलेल्या जागेसंदर्भात उपविभागीय अधिका-यांनी प्रत्येक महिन्यात आढावा बैठक घ्यावी. यासाठी संबंधित तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडून उपलब्ध असलेल्या जागेबाबत माहिती घ्यावी. जेथे जागा नाही, अशा ठिकाणी संबंधित लाभार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार जागा विकत घेऊन देण्याबाबत नियोजन करावे. तसेच नगर परिषद किंवा नगर पंचायत क्षेत्रात अतिक्रमण असेल तर नागपूरच्या धर्तीवर 500 फुट जागा देण्यासंदर्भात नियोजन करावे. भुमी अभिलेख कार्यालयाने या संदर्भात त्वरीत मोजणी करून द्यावी. जमीन मोजणीकरीता नगर पालिकेने पाठपुरावा करून प्रश्न निकाली काढावा, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गट ‘ड’ संदर्भात जिल्ह्याचे घरकुलाचे उद्दिष्ट 10741 आहे. यापैकी अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती करीता 7350 आणि इतर प्रवर्गाकरीता 3391 घरकुलाचे उद्दिष्ट असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी वर्षा गौरकार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, पालिका प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके, जिल्हा पुरवठा अधिकारी शालिकरात भराडी, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. नैताम, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह दूरदृश्यप्रणालीद्वारे नगर पालिकांचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू