स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात स्मारक उद्यान उभे करावे -राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर


स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात स्मारक उद्यान उभे करावे -राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाबाबतच्या आढावा






    पुणे           दि.20 : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात स्मारक उद्यान उभे करावे तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून लोकोपयोगी व जनहिताची कामे करण्यासाठी प्राधान्य देत शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार खर्च होईल याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिल्या. कोरोना कालावधीतील कार्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात पुणे महसूल विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, नियोजन उपायुक्त संजय कोलगणे, आणि संबंधित जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

श्री. क्षीरसागर म्हणाले, जिल्हा वार्षिक योजना व नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जनहिताच्या कामाला प्राध्यान्य देण्यात यावे. अनुसुचित जाती वस्ती सुधार योजनेचा निधी त्याच योजनेसाठी व त्याच कामासाठी खर्च करण्यात यावा. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे कार्य व विचाराच्या प्रचार प्रसारासाठी विविध उपक्रम घेण्यात यावेत. तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात स्मारक उद्यान उभे करून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी, ओपन जीम, कलादालन आदी विकासकामे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करावी, असेही त्यांनी सांगितले.

कोरोना कालावधीत पुणे विभागात कोरोना प्रतिबंधासाठी चांगले कार्य झाले असल्याचे सांगून श्री. क्षीरसागर म्हणाले, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, महसूल आणि पोलीस विभाग, स्वयंसेवी संस्था, विविध शासकीय विभाग आणि पत्रकारांनी कोरोना लढ्यात चांगली कामगिरी केली. कोरोना रुग्णांना उपचारासाठी वाढीव बील आकारणी झाले असेल त्या ठिकाणी पुन्हा लेखा परिक्षण करण्यात यावे. तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत त्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

नायडू रुग्णालयातील विकास कामांची पाहणी

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी नायडू रुग्णालयातील मैलापाणी शुद्धीकरण केंद्र, मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने रुग्णालय परिसरात उभारण्यात आलेल्या दोन इन्सिनरेटर तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या 13 किलो लिक्वीड ऑक्सिजन टाकी व जम्बो सिलिंडर रिफिलींग भेट देवून पाहणी केली.  पुणे शहरात चांगली कामे होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मनपाचे मुख्य अभियंता (विद्युत) श्रीनिवास कंदूल, कार्यकारी अभियंता योगेश माळी यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू