पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा व्यक्ती, संस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन
पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा
व्यक्ती, संस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन
वाशिम, दि. २८ : सन २०२० - २१ या वर्षापासून केंद्र सरकारने पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या नवीन योजनेस मंजुरी दिली आहे. सन २०२१-२२ या वर्षात या योजनेसाठी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत दूध प्रक्रिया जसे आईसक्रीम, चीज निर्मिती, दूध पाश्चरायझेशन, दूध पावडर इत्यादी., मांस निर्मिती व प्रक्रिया, पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटिन, खनिज मिश्रण, मुरघास निर्मिती व प्रक्रिया, पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग व्यवसायांना ९० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व्याजदरांमध्ये तीन टक्के सुट देण्यात येईल.
पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचना http://dahd.nic.in/ahdf या केंद्र सरकारच्या पशुपालन व डेअरी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या http://ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देखील या माहितीबाबतची लिंक देण्यात आली आहे. या योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचे आहे. वर नमूद उद्योग व्यवसायासोबत लिंग निश्चिती वीर्यमात्रा निर्मिती, बाह्य फलन केंद्र (आयव्हीएफ), पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्या प्रजातीचे संवर्धन या बाबींचा समावेश केलेला आहे.
जिल्ह्यातील व्यक्तिगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक संस्था, खाजगी संस्था, कलम ८ अंतर्गत स्थापन झालेल्या कंपन्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना, योजनेसंदर्भात वारंवार उपस्थित करण्यात येणारी प्रश्नोत्तरे, योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाचा अर्जाचा नमुना आणि यादी आदी माहिती घेऊन इच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ व्ही. एन. वानखेडे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME