कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे - पालकमंत्री शंभूराज देसाई
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता
आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे
- पालकमंत्री शंभूराज देसाई
वाशिम, दि. २८ : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी नागरिकांनी कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. कोणीही बेसावध राहून चालणार नाही. कोरोनाची तिसरी लाट येणार किंवा नाही, हे माहित नाही. परंतु, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
पालकमंत्री श्री. देसाई यांनी आज, २८ जून रोजी दुरदृश्य प्रणालीद्वारे कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक डॉ. विनोद वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यात ऑक्सिजनचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावा. ऑक्सिजन तुटवडा निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. आवश्यक असणारा औषधांचा साठा देखील उपलब्ध ठेवावा. जिल्ह्यात कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पात्र व्यक्तींचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसीचा पुरवठा नियमित स्वरुपात होण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पाठपुरावा करून नियोजन करावे, असे पालकमंत्री म्हणाले.
जिल्ह्यात अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. खरीप हंगामात बहुतांश पेरणी आटोपली आहे. बियाणे उगविले नाही, रासायनिक खत उपलब्ध होत नाही, अशा स्वरूपाच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येवू नयेत, यासाठी कृषि विभागाने सतर्क राहून काम करावे.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन आणि औषधीचा साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २७ टक्के पेक्षा अधिक कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. तसेच खरीप हंगामात जवळपास ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक श्री. परदेशी यांनी जिल्ह्यात कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून करण्यात येत असलेल्या कारवाई संदर्भात तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने माहिती दिली.
श्री. तोटावार म्हणाले, जिल्ह्यात सोयाबीन आणि तूर पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. काही ठिकाणी खोल पेरणी केल्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे बियाणे उगवलेले नाही. त्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणी झाली आहे, मात्र ही संख्या अल्प आहे. जिल्ह्याला आतापर्यंत मंजूर रासायनिक खतांच्या १०४ टक्के खत पुरवठा झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME