‘स्माईल’ योजनेतून मिळणार व्यावसायिक कर्ज
‘स्माईल’ योजनेतून मिळणार व्यावसायिक कर्ज
वाशिम, दि. २९ : एन.एस.एफ.डी.सी., नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्या मार्फत कोविड-१९ च्या महामारीत अनुसूचित जातीच्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाला आहे, त्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी वारसदाराला ‘स्माईल’ योजनेतून व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना विचाराधीन आहे. या योजनेत १ लाख ते ५ लाखापर्यंत कर्ज मिळणार असून यामध्ये यांनी एस.एफ.एफ.डी.सी चा सहभाग ८० टक्के व भांडवल अनुदान २० टक्के मिळणार आहे. या योजनेसाठी व्याज दर ६ टक्के असून परतफेडीचा कालावधी ६ वर्ष आहे.
सदर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जदार हा अनुसूचित जातीचा असावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ३ लाखापर्यंत असावे. अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा. कुटुंब प्रमुखाच्या रेशनकार्डमध्ये सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा ही १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकती पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. मृत्यु प्रमाणपत्र महानगरपालिका किंवा नगरपालिकेने दिलेले असावे. स्मशानभूमी प्राधिकरणाने दिलेली पावती, एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेले मृत्यु प्रमाणपत्र यापैकी एक दस्तऐवज असणे आवश्यक आहे.
स्माईल योजनेतून व्यावसायिक कर्ज मिळण्यासाठी मयत व्यक्तीचे नाव व पत्ता, आधारकार्ड, तीन लाख रुपये पर्यंत उत्पन्नाचा दाखला, कोविड-१९ मुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या मृत्यूचा दाखला, रेशनकार्ड व वयाचा पुरावा ही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने वरील माहितीसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, नालंदा नगर येथील महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एम. एस. धांडे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME