‘ईव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रणेसाठी आता स्वतंत्र गोदाम; पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
‘ईव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रणेसाठी आता स्वतंत्र गोदाम; पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
निवडणूक यंत्रणेचा उपक्रम
अमरावती, दि. 28 : निवडणुकीतील महत्वपूर्ण साधने असलेल्या ‘ईव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट” यंत्रणा सुस्थितीत व सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र गोदामाची उभारणी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून करण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाले.
माजी राज्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, विधानसभा सदस्य सुलभाताई खोडके, बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, महापौर चेतन गावंडे, जि. प. उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सभापती पूजा आमले, बाळासाहेब हिंगणीकर, सुरेश निमकर, जयंतराव देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार आदी उपस्थित होते.
सामान्य प्रशासन विभागाकडून या कामासाठी 14 कोटी 99 लक्ष रुपये निधीच्या नियोजनाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे हे काम होत आहे.
अशी असेल रचना
गोदाम इमारतीची तळमजला व पहिला मजला अशी रचना असेल. एक हजार 926 चौरस मीटर जागेत तळमजल्यावर 6 मतमोजणी कक्ष असतील. मतदान यंत्रणेसाठी सुरक्षा कक्ष असेल. दर्शनी भागात आवक जावक कक्ष, स्वच्छतागृह आदी सुविधा असतील. पहिल्या मजल्यावर कार्यालय असेल. त्याशिवाय, सुरक्षेसाठी मजबूत आवारभिंती, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण, अग्निशमन व्यवस्था आदी बाबी असतील.
यंत्रणेची सुस्थिती व सुरक्षितता राखण्यासाठी हे गोदाम उपयुक्त ठरणार आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME