गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या दरात सुधारणा; १ जुलै पासून नवीन दर लागू होणार
गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या दरात सुधारणा; १ जुलै पासून नवीन दर लागू होणार
मुंबई, दि. 28 : गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. येत्या 1 जुलै 2021 पासून नवीन दर लागू होणार असल्याचे महसूल व वन विभागाने कळविले आहे.
बांधकाम साहित्य म्हणून वापरण्यात येणारा चुना तयार करण्यासाठी भट्ट्यांमध्ये वापरण्यात येणारी चुनखडी व शिंपल्यापासून केलेल्या चुन्याचा दर आता 600 रुपये प्रति ब्रास असणार आहे. उत्खननाद्वारे किंवा गोळा करुन काढलेले सर्व दगड आणि दगडाच्या भुकटीचा दर सुद्धा आता 600 रुपये प्रति ब्रास असणार आहे.
बांधकामासाठी वापरण्यात येणारा जांभा दगडाचा (लॅटराईट स्टोन) दर 150 रुपये प्रति ब्रास असेल. उत्खननाद्वारे काढलेले किंवा गोळा केलेले गोटे, बारीक खडी, मुरुम, कंकर यांचा दर 600 रुपये प्रति ब्रास असेल. केवळ बॉलमिल्सच्या प्रयोजनाकरिता वापरण्यात येणारे चॅल्सेडोनी खडे यांचा दर 3000 रुपये प्रति ब्रास असणार आहे.
सिरामिक किंवा मृतिकाशिल्पे तयार करण्याच्या प्रयोजनार्थ, धातूशास्त्रीय प्रयोजनार्थ, दृष्टिविषयक प्रयोजनार्थ, कोळसा खाणीमध्ये साठवून ठेवण्याच्या प्रयोजनार्थ, सिल्व्हीक्रेट सिमेंट तयार करण्यासाठी आणि मातीची भांडी आणि काच सामान तयार करण्यासाठी वापरण्यात न येणारी सर्वसामान्य वाळू यांचा दर मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राकरिता 1200 रुपये प्रति ब्रास तर मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र वगळून इतर क्षेत्राकरिता 600 रुपये प्रति ब्रास असणार आहे.
कौले (मंगलोरी किंवा अन्य कोणत्याही प्रयोजनाची) तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी साधी चिकणमाती, अंतर्गत बंधारे, रस्ते, लोहमार्ग आणि इमारती यांचे बांधकाम करताना भरणा करण्यासाठी/भूपृष्ठ सपाट करण्यासाठी वापरण्यात येणारी साधी माती, बांधकामाचे साहित्य म्हणून वापरण्यात येते त्यावेळी पाटीचा दगड किंवा नरम खडक या सर्वांचा दर 600 रुपये प्रति ब्रास असणार आहे.
विटा तयार करण्याच्या आणि इतर प्रयोजनासाठी वापरण्यात येणारी साधी माती, गाळ आणि सर्व प्रकारची चिकणमाती इत्यादी याचा दर 240 रुपये प्रति ब्रास असणार आहे.
फुलरची माती किंवा बेटोनाईट याचा दर 1500 रुपये प्रति ब्रास असेल. सजावटीच्या प्रयोजनासाठी वापरावयाचे इतर सर्व प्रकारचे दगड (ग्रॅनाईट वगळून) याचा दर 3000 रुपये प्रति ब्रास असेल. इतर सर्व गौण खनिज (ग्रॅनाईट वगळून आणि केंद्र शासनाने दिनांक 10 फेब्रुवारी 2015 अन्वये घोषित केलेली गौण खनिजे वगळून) दर 600 रुपये प्रति ब्रास असेल. गौण खनिजे (ग्रॅनाईट वगळून आणि केंद्र शासनाने दिनांक 10 फेब्रुवारी 2015 अन्वये घोषित केलेली गौण खनिजे वगळून) दर 9000 प्रति हेक्टर किंवा त्याच्या भागासाठी असेल.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME