‘माविम’ने महिलांच्या शाश्वत विकासासाठी पुढाकार घ्यावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
‘माविम’ने महिलांच्या शाश्वत विकासासाठी पुढाकार घ्यावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. 26 : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या 24 फेब्रुवारी या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्ष ज्योती ठाकरे, व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा, महाव्यवस्थापक कुसुम बाळसारफ, राजस कुंटे व रुपा मेस्त्री यांनी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेतली व महामंडळ करत असलेल्या कामाबाबत सादरीकरण केले. यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महामंडळाने केलेल्या कामाची प्रशंसा केली व महामंडळाने महिलांच्या शाश्वत विकासाच्या अनुषंगाने शासकीय योजनांमध्ये महिलांचा सहभाग वाढवून विकासामध्ये सहभाग वाढवावा असे सांगितले. यावेळी त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाचे गेल्या 46 वर्षात केलेल्या कामासंदर्भात कौतुक केले.
उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, यूएनने 1 ऑक्टोबर 2020 रोजी घेतलेल्या सभेत 2020 ते 2030 हे दशक कृती दशक म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे शाश्वत विकासासाठी शासनाला कार्यवाही करावी लागेल. यावेळी माविम ने उद्योग विभागाच्या नवीन धोरणामध्ये महिलांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा विकास समितीच्या बैठकीवेळी हजर राहून आपले चांगले काम पालकमंत्री व लोकप्रतिनिधी यांना सादर करावे व त्यांच्या सूचनांचा आपल्या कामात अंतर्भाव करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात अनेक नवनवीन प्रयोग व कामे केली जातात त्या ठिकाणी माविमने महिलांच्या वतीने सहभाग वाढविला पाहिजे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी बचत गटांना आवश्यक काम मिळवून दिले पाहिजे. देशात कृषी पर्यटन सुरू झाले आहे. या ठिकाणी महिलांचा सहभाग वाढविण्यास खूप वाव आहे असे डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
यावेळी व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा यांनी माविम ने केलेल्या कामाची माहिती देताना सांगितले, माविम चे १.४३ लाख बचतगट आहेत. या बचत गटांमार्फत ३८०० कोटी रुपयांचे कर्ज वाटप होऊन कर्ज परतफेड ही ९९% आहे.
माविमबरोबर १६ लाख महिला जोडल्या गेलेल्या आहेत. अनेक महिलांचे व्यवसाय सुरू झाले असून या महिलांचा कुटुंबाच्या उत्पन्नात ५०% पेक्षा जास्त सहभाग आहे असे माविमच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME